पुणे

पिंपरी : अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित व कोटा अंतर्गत तीन फेर्‍यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 38.05 टक्के जागांवर प्रवेश झाले आहे. तर, अद्याप 61.95 टक्के जागा रिक्त आहेत. विशेष फेरीतील प्रवेश अद्याप झाले नसले तरीही रिक्त जागांमध्ये फार घट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचेच चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. अकरावीच्या नियमित तीन फेर्या यापूर्वी झाल्या आहेत. विशेष फेरी सध्या सुरू असून त्याची यादी जाहीर होणे बाकी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीच्या ऑनलाईन अर्जासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली.

अकरावीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील 326 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 1 लाख 15 हजार 950 इतक्या प्रवेश क्षमतेसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यामध्ये नियमित प्रवेशप्रक्रियेत 97 हजार 815 तर, कोटा प्रवेशासाठी 18 हजार 135 जागा आहेत. नियमित प्रवेशप्रकियेतून 37 हजार 550 जागांवर तर, कोटा प्रवेशप्रक्रियेतून 6 हजार 564 जागांवर प्रत्यक्ष प्रवेश झाले आहेत.

दोन्ही मिळून 44 हजार 114 जागांवर प्रत्यक्ष प्रवेश पूर्ण झाले आहेत. नियमित प्रवेशाच्या 60 हजार 265 आणि कोटा प्रवेशाच्या 11 हजार 571 अशा एकूण 71 हजार 836 जागा सध्या रिक्त आहेत. एकूण जागांच्या तुलनेत रिक्त असणार्‍या जागांचे प्रमाण टक्केवारीत जवळपास 61.95 टक्के इतके आहे. यामध्ये विशेष फेरीतील प्रवेशाची आकडेवारी गृहीत धरूनही रिक्त जागांमध्ये फारशी घट होण्याची शक्यता कमी आहे.

अकरावी प्रवेशास कमी प्रतिसादाची कारणे

  • तीन फेर्‍यांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित कट ऑफ कमी झाला नाही.
  • पर्यायाने, विशेष फेरीत कट ऑफ कमी होऊन विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढेल, असा जाणकारांचा अंदाज
  • प्रत्यक्षात प्रवेश मिळूनही तो नाकारण्याकडे विद्यार्थ्यांचा कल
  • दहावीनंतर अकरावीला प्रवेश घेण्यापेक्षा इतर कौशल्य अभ्यासक्रम, एकात्मिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती
  • दहावीनंतरचा डिप्लोमा त्याचप्रमाणे आयटीआयला लक्षणीय प्रतिसाद

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेर्‍यांमध्ये मेरीट उच्च पातळीवर होते. लिस्ट लागली तरी कट ऑफ कमी होत नव्हता. विशेष फेरी कमी होईल तेव्हा कट ऑफ कमी होईल. विशेष फेरीची यादी येत्या सोमवारी (दि. 24) लागणार आहे.

– डॉ. रणजित पाटील, प्राचार्य,
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पिंपरी.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT