Student Protest Pudhari
पुणे

Pune Swadhar Scheme Student Protest: ‘स्वाधार आमच्या हक्काची’चा एल्गार; सात दिवसांचे विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

समाजकल्याण आयुक्तांचे लेखी आश्वासन; स्वाधार-वसतिगृह अर्जातील अडचणी दूर करण्यासाठी २० ऑगस्टला महाआयटीसोबत बैठक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आणि अन्नत्याग आंदोलन सुरू होते. अखेर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. समाजकल्याण आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींबाबत गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) बैठकीचे लेखी आश्वासन दिले आहे.

आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी सातव्या दिवशी संतप्त होत ‘स्वाधार आमच्या हक्काची’ अशा घोषणा देत थेट आयुक्त कार्यालयात ठिय्या दिला. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आक्रोशाची दखल घेत आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी मार्ग काढत दि. २० ऑगस्टपर्यंत सर्व प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले.

दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची पुण्यात भेट घेतली होती. धोरणात्मक मुद्दे निकाली काढण्यासाठी १७ किंवा १८ ऑगस्ट रोजी शासकीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते. परंतु, अद्याप या बैठकीबाबत कोणताही निरोप न आल्यामुळे समाजकल्याण विभाग वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अखेर सातव्या दिवशी आयुक्तांच्या लेखी आश्वानानंतर आंदोलन मागे घेतले.

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाटोळे यांनी आयुक्तांशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी केली. या वेळी राज्य युवक कार्यकारी पदाधिकारी विशाल गवळी, शहराध्यक्ष अरविंद तायडे, रफिक शेख यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. या वेळी उपाध्यक्ष संघर्ष शिरसोदे, खुशी वानखेडे, प्रज्ञा वाघमारे, प्रदीप दवणे, गौरी पूर्वे, निकिता मस्के, साक्षी वानखेडे, साहिल पारकर, प्रकाश गोरे यांसह अनेक विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अशी आहेत बैठकीतील प्रमुख आश्वासने

स्वाधार व वसतिगृह योजनेचे अर्ज भरताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी २० ऑगस्ट रोजी ‘महाआयटी’च्या अधिकार्‍यांसोबत विशेष बैठक आयोजित केली जाईल. यवतमाळ जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयातील विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करणार्‍या स्वाधार विभागप्रमुखाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश उशिरा झाले, त्यांना स्वाधार योजनेचा एक हप्ता वितरित केला जाईल. प्रलंबित अन्वेषण अर्ज या महिनाअखेरपर्यंत मार्गी लावले जातील.

संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृहाच्या जुन्या इमारतीला १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आहे. ऐतिहासिक वारसा हा आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत धोरणात्मक व तांत्रिक अडचणी पूर्णपणे दूर होऊन प्रत्येक पात्र विद्यार्थ्याच्या खात्यावर स्वाधारचे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
राजरत्न बलखंडे, अध्यक्ष, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT