पुणे

पशुधनाच्या ईअर टॅगिंगची काटेकोर अंमलबजावणी करा : डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत 'भारत पशुधन प्रणाली' मध्ये ईअर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत असून शेतकर्‍यांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची सर्व संबंधित विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाच्या भारत पशुधन प्रणालीमध्ये ईअर टंगिग (12 अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. या प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू आदी सर्व माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी, तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, तसेच पशू व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशूधनास कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्था यांना विविध निर्देश दिले आहेत. त्यानुसार 1 जूननंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येऊ नये. आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. सर्व महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांनी नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देण्यात येऊ नये. कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर योग्य कायदेशीर, दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.

1 जूनपासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची, बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी- विक्री व बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे टॅग नसलेल्या पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये.पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍याकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT