पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एचआयव्ही रुग्णांवर उपचारासाठी उभारलेल्या एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) केंद्रावरील ताण कमी करण्यात येणार आहे. येथे नोंदणी असलेल्या 6 हजार 869 रुग्णांपैकी सुमारे 3 हजार रुग्णांना जवळच्या एआरटी सेंटरवर उपचार देण्याबाबत कळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, काळजी, आधार व उपचार विभागाचे सहायक संचालक प्रदीप सोनवणे यांनी ई-मेलद्वारे याबाबत सूचना दिल्या आहेत. वायसीएम एआरटी केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या एचआयव्ही रुग्णांना जिल्ह्यातील जवळच्या एआरटी केंद्रामध्ये उपचारासाठी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु करावी. ज्यामुळे भविष्यात रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 2008 पासून एआरटी केंद्र सुरु आहे.
वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बावळे म्हणाले, सध्या रुग्णालयातील एआरटी केंद्रात 6 हजार 869 रुग्णांची नोंद झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्येची नोंद झाल्याने त्याचा अतिरिक्त ताण एआरटी केंद्रावर पडत आहे. महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेच्या निर्देशानुसार कार्यवाही करताना रुग्णांना जवळच्या एआरटी सेंटरमध्ये उपचार देण्याबाबत कळविण्यात येणार आहे. तथापि, त्यासाठी वायसीएममधील एआरटी केंद्र बंद करण्यात येणार नाही. या केंद्रातंर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण राहणार आहेत. सुमारे 3 हजार रुग्णांचे स्थलांतर होईल. उर्वरित रुग्ण वायसीएममधील एआरटी केंद्रातंर्गत उपचार घेतील, अशी माहिती वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
हेही वाचा