खेड: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात एका बेकरीसमोर शनिवारी (दि. २३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका मोकाट व पिसाळलेल्या श्वानाने वकिलावर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. त्यांना खोल जखम झाली असुन त्यावर १० टाके घालण्यात आले आहेत. त्यांना डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचा सल्ला दिला आहे.
याप्रकरणी पीडित वकिलाने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण न ठेवल्याबद्दल बी.एन.एस. कलम २९१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Latest Pune News)
पीडित वकील ॲड स्वप्नील जाधव गेल्या १० वर्षांपासून राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. ते आपला २ वर्षीय मुलगा श्रियांश आणि वडिलांसोबत दुचाकीवरून एका दवाखान्यात जात होते.
यावेळी जनता बेकरीसमोर एक पांढऱ्या रंगाचा, काळ्या डागांचा मोकाट कुत्रा अचानक डाव्या बाजूने पळत आला आणि स्कूटीच्या फुटरेस्टवर असलेल्या वकिलाच्या डाव्या पायाच्या पंज्यावर चावा घेतला. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.
पीडित वकिलाने तक्रार अर्जात म्हटले आहे की, राजगुरुनगर नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली. यामुळे त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला असून, नगरपरिषद याबाबत काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, हे पिसाळलेले श्वान अज्ञात व्यक्तींनी मारून टाकले असल्याची चर्चा आहे. तरीही ते श्वान इतर कुत्र्यांना चावले असुन नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले आहे.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हद्दीत विविध भागात शनिवारी (दि २३) आणि रविवारी (दि २४) अशा दोन दिवसांत २० ते २५ जणांना या श्वानाने चावा घेतला आहे. त्यातील काही जणांना गंभीर जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अशा घटनेतील नागरिकांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळतील अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांना याबाबत प्रतिक्रिया साठी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.