पुणे

पुणे : दौंडला बोगस पत्रकारांना आवर घालण्याची मागणी

अमृता चौगुले

यवत : पुढारी वृत्तसेवा

दौंड तालुक्यातील बोगस, स्वयंघोषित, खंडणीखोर पत्रकारांना आवर घालण्याची गरज आहे, असे मत बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा प्रवक्ते उत्तम गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दौंड तालुक्यात अशा बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून, तालुक्यातील शासकीय यंत्रणा या लोकांना पार वैतागून गेली आहे.

कुठल्याही प्रकारची नोंदणी नसताना आम्ही पत्रकार आहोत, असे सांगून ही मंडळी धमकावून थेट पैसे उकळत आहेत. अवैध धंदे बंद जरूर करावेत, परंतु पाचशे आणि हजार रुपये घेऊन आम्ही पत्रकार आहोत तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगत 'पत्रकार' शब्दाला हे बोगस लोक काळीमा फासत आहेत. या बोगस पत्रकारांनी फक्त पोलिस आणि महसूल विभाग आपले 'टार्गेट' केले आहे. आपल्याला दहा-पाच रुपये मिळाले की सगळं सुरळीत करायचं अस धोरण हे बोगस पत्रकार करीत आहेत , असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

दौंड तालुक्यात बेकायदेशीर धंदे सुरू असतील, तर जरूर आवाज उठवला पाहिजे. परंतु, काही शेतकरी आपल्या शेताचे सपाटीकरण करीत असतील किंवा शेतजमीन विकसित करीत असतील, तर 'अवैध उपसा सुरू आहे' असे म्हणत या बोगस पत्रकारांची टोळी दाखल होते व 'आमचं बघा नाहीतर महसूलमधील वरिष्ठांना फोन करतो' असे सांगत थेट आपले खिसे गरम करून घेत आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. वेठीस धरण्याच्या या बोगस पत्रकारांच्या प्रवृत्तीला 'वाद नको' म्हणून काही लोक यांना पैसे देत आहेत, यामुळे खरे पत्रकार क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे, असे ही गायकवाड यांनी म्हटले आहे.

तक्रार दिल्यास गुन्हे दाखल करू : पवार

पत्रकारांच्या नावाखाली कोणी नाहकपणे पैशांची मागणी करीत असेल आणि यासंबंधी कोणी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करू, असा इशारा यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT