पुणे

भाटघर, निरा देवघरमधील विसर्ग बंद करा : आमदार संग्राम थोपटे

Laxman Dhenge

भोर : पुढारी वृत्तसेवा : शासनाने इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, या दुष्काळाच्या नावाखाली निरा देवघर, भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी, भोर तालुक्यातील धरणाच्या पाण्यावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांतून विसर्ग ताबडतोब बंद करावा; अन्यथा
आंदोलन करण्याचा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी जलसंपदा विभागाला निवेदन देऊन केला. भोर येथे रायरेश्वर डोंगरी विकास परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार संग्राम थोपटे यांनी ही माहिती दिली.

या वर्षीचे आवर्तनाचे नियोजन पाहता भाटघर धरणाची पाणीपातळी मागील वर्षीच्या तुलनेने यंदा 20 टक्के, तर निरा देवघर धरणाचा साठा 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. धरणाच्या पाण्याच्या विसर्गाची परिस्थिती अशीच सातत्याने राहिली तर पूर्व-पश्चिम भागातील गावांना दोन्ही धरणांच्या पाणीपुरवठ्याच्या योजनांना भविष्यात काही महिन्यांमध्ये पाणी उपलब्धततेच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शेतीची आवर्तने देखील दोन्ही धरणांवर अवलंबून आहेत. भोर शहराचा पाणीपुरवठा भाटघर धरणावरून होत असून, या दोन्ही धरणांतील पाणी जादा प्रमाणावर सोडले तर या भागातील स्थानिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे स्थानिक नागरिक आवर्तनाबाबत तक्रारी घेऊन येत आहेत. या आवर्तनांमुळे शेतकरी, नागरिक भयभीत झालेले असून, पाणी उपलब्धतेबाबतीत स्थानिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांतील आवर्तनाव्दारे जादा प्रमाणात सोडण्यात येणारे पाणी तातडीने बंद करण्याची मागणी आ. संग्राम थोपटे यांनी केली आहे.

भोर तालुक्यात मेपर्यंत आवर्तन द्या

दोन्ही धरणांच्या उजवा-डावा कालवा अस्तरीकरणाची कामे रखडले आहेत. यामुळे कालव्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. अस्तरीकरणाच्या कामासाठी शासनाकडे वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे कालव्यांची दुरवस्था झाली आहे. अधिकार्‍यांवर राजकीय दबाव टाकून निरा देवघर, भाटघर धरणांतील पाणी पूर्व पट्ट्यात पळविले जात आहे. यामुळे संबंधित विभागावर नाराजी व्यक्त करीत भोर-वेल्हा तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांना मे महिन्याच्या शेवटपर्यंत आवर्तन देण्याची मागणी देखील आ. थोपटे यांनी केली.

धोम-बलकवडीच्या उजवा कालव्याला पाणी सोडा

सातारा जिल्ह्यातील धोम-बलकवडी उजवा कालव्यावरील पाण्यावर भोर तालुक्यातील वीसगाव आणि चाळीसगाव खोर्‍यातील अनेक गावांचे शेतीक्षेत्र ओलिताखाली येत आहे. मात्र, या कालव्याला धरणातून आवर्तन न सोडल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणीपातळीत घट होत आहे. त्यामुळे धरणाच्या उजवा कालव्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT