मंचर: पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथील दोन शेतकरी कुटुंबांच्या कौलारू घरांवर आठवड्यापासून दगडफेक होत आहे. नागरिकांकडून रात्रीचा जागता पहारा देऊनदेखील ही दगडफेक सुरू आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार पारगाव पोलिस ठाण्यापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर होत आहे.
दगडफेक करणार्याची शोधमोहीम सुरू असूनही ही अज्ञात व्यक्ती सापडत नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दगडफेकीमुळे घरावरील कौले आणि सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाले आहे. (Latest Pune News)
पारगाव शिंगवे येथील वाडावस्तीत शेतकरी बाबाजी काशिनाथ ढोबळे आणि पांडुरंग किसन ढोबळे हे राहतात. त्यांच्या घराच्या छतावर इंग्रजी कौले आणि सिमेंट पत्रे आहेत. त्यांच्या घरांवर रात्रीच्या वेळी सुमारे एक ते दीड किलो वजनाचे दगड, विटा, फरशीचे तुकडे फेकले जातात.
हा प्रकार गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे सुमारे 20 ते 25 तरुण जागता पहारा ठेवतात. मात्र, दगडफेक करणारी अज्ञात व्यक्ती सापडली नाही. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही व्यक्ती सापडत नसल्याने पोलिस हतबल, तर ढोबळे कुटुंबीय हैराण झाले आहे.
पोलिसांसमोर दगडफेक
रात्रीची गस्त घालणार्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्या वेळी पोलिसांसमोरही दगडफेक झाल्याचे ढोबळे कुटुंबीय सांगत आहे. त्युमळे या कुटुंबात, वस्तीवर भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याची भीती कायम
ढोबळे कुटुंबीय व तरुण झोपण्यासाठी घरात गेल्यावर दगडफेक होते, असे ढोबळे कुटुंबीयांनी सांगितले. रात्रीच्या वेळी दगडफेक कोण करते, हे पाहण्यासाठी गेलेल्या ढोबळेंना बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे एकीकडे दगडफेक, तर दुसरीकडे बिबट्याची भीती देखील आहे. आता पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, दगडफेक करणार्या अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा व त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दगडफेक होत असल्याने मित्र विशाल ढोबळे याच्यासह पहाटेपर्यंत पहारा ठेवला. पहाटे चारच्या सुमारास दगड पडतात, त्यामुळे त्याच घरात कॉटखाली झोपलो. त्या वेळी घरावर दगड आले. आम्ही लगेच पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिसही आले. दरम्यान, रस्त्यामध्ये त्यांना बिबट्या दिसला होता. पोलिसांसमोर देखील घरावर दगड पडले. याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी आणि ढोबळे कुटुंबीयांना दिलासा द्यावा.- प्रशांत पोंदे, पारगाव ग्रामस्थ
दगड कोण फेकतोय, याचा शोध घेतला जातोय. त्याची कोणाला माहिती असेल तर द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. आता घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जातील. पोलिसांच्या समक्ष दगडफेक झाली असेल, तर मला सहकार्यांनी सांगितलेले नाही. दगडफेक करणार्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.- नेताजी गंधारे,सहायक पोलिस निरीक्षक, पारगाव