stepfather life imprisonment child assault
पुणे: तीन वर्षांच्या मुलीवर पाशवी पद्धतीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला पुण्याच्या विशेष न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला.
दंडाची रक्कम भरल्यानंतर पीडितेला नुकसान भरपाई स्वरूपात द्यावी, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. याबाबत, पीडितेच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. (Latest Pune News)
ही घटना पाच फेबुवारी 2018 रोजी घडली. त्याच्या दोन महिन्यांपूर्वी तक्रारदार महिलेचे आरोपीशी लग्न झाले आहे. घटनेच्या दिवशी रात्री नऊ वाजता आरोपीने पत्नीशी कडाक्याचे भांडण करून तिच्या लहान मुलीला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी मुलीला घेऊन घरी आला.
त्या वेळी पीडित मुलीचे नाक, तोंड, डाव्या हाताचा अंगठा आणि गुप्तांग रक्ताने माखलेले दिसले. आईने मुलीकडे चौकशी केल्यानंतर आरोपीने तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केल्याचे समजले. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले, तर तक्रारदारांच्या वतीने ॲड. गौरव जाचक यानी बाजू मांडली.
या प्रकरणात, सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची आई आणि चारही वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित मुलीला झालेल्या गंभीर वेदनादायी जखमांमुळे तिच्यावर तीन महिने रुग्णालयात उपचार करावे लागले.
त्यामुळे आरोपीने केलेला घृणास्पद गुन्हा पाहता, त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. कोंघे आणि ॲड. जाचक यांनी केला. नराधमाच्या क्रूर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारामुळे पीडित मुलीच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे असह्य वेदनेने कळवळणाऱ्या पीडितेला भूल देऊन तिच्यावर शस्त्रक्रिया करत गुप्तांगांची पुनर्बांधणी करावी लागली होती. त्याचा उल्लेख करत न्यायाधीशांनी हा निकाल दिला.