पुणे

गतिमान कामांतून विरोधकांच्या टीकेला उत्तर; मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आम्ही घरात बसून कामे करीत नसून, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामे करीत आहोत. मुंबईतील नालेसफाईचे कामही प्रत्यक्ष जाऊन पाहिले. गेल्या 11 महिन्यांत लोकहिताचे अनेक धाडसी निर्णय घेऊन गतिमान कामकाज सुरू आहे. कामाचा हा धडाका पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांच्या आरोपाला कामांच्या माध्यमातून उत्तर देत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे शुक्रवारी (दि.16) केले.

'शासन आपल्या दारी' या उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, शिवसेनेचे इरफान सय्यद, सदाशिव खाडे, नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

महापालिका व राज्य शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धनादेश, साहित्य, घरकुलाच्या चाव्या, बेबी किट, व्हीलचेअर, शालेय साहित्य तसेच, तृतीयपंथीयास नोकरीपत्र आदींचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'शेतकर्‍यांसाठी सिंचनाच्या तब्बल 29 प्रकल्पांसाठी 18 हजार कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. मागचे मंत्री पाणी नाही धरणात, असे म्हणत त्यांनी करंगळी दाखविली. त्यामुळे हशा पिकला. शेतकर्यांना नुकसान भरपाई एनडीआरएफच्या दुप्पट तसेच, दोनऐवजी तीन हेक्टर अशी मर्यादा वाढविली आहे.

महाविकास आघाडीत परदेशी कंपन्या राज्यात येत नव्हत्या. आता अनेक कंपन्या राज्यात येत असून, देशात राज्य क्रमांक एकवर आला आहे. त्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे. महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन निधी देणार आहे. पीएमआरडीएच्या भूसंपादन बाधिताचे प्रश्न मार्गी लावले आहेत. 12.5 टक्के परताव्याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम शास्तीकर माफ करून तब्बल 460 कोटींचा भुर्दंड माफ केला आहे.

पुण्यातील चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी अडीच एकर जागा दिली आहे. पवना व इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी एमआयडीसीत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहे. निगडी, प्राधिकरणातील यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी त्यांनी जाहीर केला.'

आ. अश्विनी जगताप म्हणाल्या, 'चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी संजय गांधी निराधार योजनेचा सर्वांधिक लाभ घेतला आहे. उत्पन्नाच्या दाखल्याची दरवर्षी सक्ती केली जाऊ नये.' खा. बारणे म्हणाले, 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम एका दिवसाऐवजी दोन दिवस ठेवावा. या उपक्रमात वेगात कामे होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

उपक्रम चांगल्या प्रकारे चालावा म्हणून अधिकार्यांनी ही कामे प्राधान्याने करावीत. आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महापालिकेच्या विविध योजनांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे व उल्हास जगताप यांनी स्वागत केले. तसेच, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आभार मानले.

उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांतून एकदाच घेणार : मुख्यमंत्री

आ. अश्विनी जगताप यांनी विविध लाभांसाठी उत्पन्नाचे दाखले दरवर्षी घेतले जाऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. तो धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उत्पन्नाचा दाखला दरवर्षी सादर करण्याची गरज नाही. पाच वर्षांतून एकदाच तो दाखला घेतला जाईल. तसा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT