Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education Board Jobs 2025
गणेश खळदकर
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये तब्बल 300 कर्मचार्यांची पदभरती करण्यात येणार आहे. संबंधित पदभरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पदभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे.
राज्य मंडळातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक या नऊ विभागीय मंडळांमध्ये दहावी-बारावी परीक्षा तसेच अन्य कामे केली जातात. संबंधित संस्था स्वायत्त आहे. त्यामुळे मंडळाकडे जमा होणार्या महसुलामधूनच कर्मचारी भरती करणे, त्यांचे पगार तसेच पेन्शनसह अन्य सोयी-सुविधा दिल्या जातात. (Latest Pune News)
2019 मध्ये राज्य मंडळासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये 266 कनिष्ठ लिपिकांची पदे भरण्यात आली. परंतु गेल्या सहा वर्षांत अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त झाली असून, पदे रिक्त असल्यामुळे अन्य कर्मचार्यांवर देखील कामाचा ताण येत आहे. त्यामुळेच कामाला गती मिळावी आणि परीक्षा तसेच अन्य कामे सुरळीत पार पाडता यावी यासाठीच तब्बल 300 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंडळाकडूनच कर्मचार्यांचे पगार होत असले तरी भरती प्रक्रियेसंदर्भात प्रशासकीय मान्यता घेणे गरजेचे असते. त्यामुळे संबंधित पदभरतीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. संबंधित प्रस्ताव लालफितीमध्ये न अडकता जर त्या प्रस्तावाला लवकर मान्यता
मिळाली तर राज्य मंडळासह विभागीय मंडळांमध्ये लवकरच तब्बल 300 नवीन कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणार्या तरूणांसाठी एक चांगलीच संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित पदभरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा परीषद संबंधित परीक्षा ऑनलाईन घेणार की ऑफलाईन घेणार पदभरती नेमकी कुणामार्फत राबविली जाणार यासंदर्भातील स्पष्टता प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच देता येणार असल्याचे राज्य मंडळातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त आहेत. त्यातीलच 286 पदे क्लर्कची आणि 11 पदे तांत्रिक अशी एकूण 297 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी संबंधित प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संबंधित पदभरतीची परीक्षा घेण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ