टाकळी हाजी: पूर्वसूचना न देता बसफेऱ्या रद्द करणे, अर्ध्या मार्गातून बस परत आणणे व वेळापत्रकाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिरूर आगाराच्या सेवेत दोष असल्याचे स्पष्ट करत पुणे जिल्हा ग््रााहक तक्रार निवारण आयोगाने विद्यार्थ्याच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नुकसान भरपाई, शारीरिक व मानसिक त्रासापोटी विद्यार्थ्याला 15 हजार रुपये तसेच तक्रार खर्चापोटी 1 हजार 20 रुपये देण्याचे आदेश आयोगाने एसटी महामंडळाला दिले आहेत.
सविंदणे (ता. शिरूर) येथील विद्यार्थी सागर तान्हाजी रोकडे हा टायपिंग क्लाससाठी शिरूर आगाराच्या बसने नियमित प्रवास करत होते. यासाठी त्यांनी 16 जून 2022 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीसाठी 5 हजार 400 रुपयांचा मासिक विद्यार्थी पास काढला होता.मात्र, शिरूर-लोणी व शिरूर-पहाडदरा मार्गावरील बसगाड्या अनेकदा वेळेवर न लागणे, कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करणे किंवा अर्धवट मार्गातून परत आणणे, यामुळे विद्यार्थ्याला वारंवार खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. परिणामी त्याला आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता.
या संदर्भात विद्यार्थ्याने एसटीकडे तक्रार पुस्तिकेत तसेच ई-मेलद्वारे अनेक वेळा तक्रारी केल्या. उपोषणाचा इशाराही दिला. मात्र, सेवेत कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर ग््रााहक आयोगाकडे दाद मागण्यात आली. आयोगासमोर एसटी महामंडळाने प्रवाशांची संख्या अपुरी असल्याने काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचा युक्तिवाद केला.
मात्र, आयोगाने हा युक्तिवाद फेटाळत ग््राामीण भागात एसटी हाच मुख्य प्रवासाचा पर्याय असल्याचे नमूद केले. एकदा पासचे पैसे स्वीकारल्यानंतर नियोजित वेळेनुसार व पूर्ण मार्गावर बस चालविणे ही एसटीची जबाबदारी आहे. केवळ नफ्याचा विचार करून बस रद्द करणे ही सेवा दोषाची बाब आहे, असे स्पष्ट मत आयोगाने नोंदविले. लाऊडस्पीकरवर ऐनवेळी घोषणा करणे म्हणजे पूर्वसूचना ठरत नाही, असेही आयोगाने नमूद केले.
सर्व बाबींचा विचार करून आयोगाने तक्रार मंजूर करत 45 दिवसांत 15 हजार रुपये नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत रक्कम न दिल्यास 12 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. या निकालामुळे ग््राामीण भागातील प्रवाशांच्या हक्कांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.