पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांच्या नियुक्तीला चार महिने संपत आले. परंतु, त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाही. डॉ. सानप पदभार स्वीकारणार की, विद्यापीठाला पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार याचा निर्णय उद्या मंगळवारी (दि. २३ जून) न्यायालयात होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाचा तिढा उद्या तरी सुटणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
विद्यापीठ प्रशासनाने डॉ. सानप यांच्या नियुक्तीचे आदेश काढताना मूळ संस्थेचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' आणि संस्थेने कार्यमुक्त केल्याचे पत्र सादर करण्याची अट टाकली होती. परंतु, संस्थेने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.
त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. मंगळवारी संबंधित प्रकरणावर अंतिम निकाल येणार आहे. यामध्ये डॉ. सानप यांच्या बाजूने निकाल लागला तर न्यायालय विद्यापीठाला डॉ. सानप यांना रूजू करून घेण्याचे निर्देश देईल.
त्यानंतरच पुढील पाच वर्षांसाठी डॉ. सानप हे विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून कार्यरत राहतील. परंतु, निकाल डॉ. सानप यांच्या विरोधात गेला तर मात्र विद्यापीठाला कुलसचिव नियुक्तीची प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे.
अडीच वर्षांपासून कुलसचिवपदाची संगीत खुर्ची
विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२३ मध्ये संपला. तेव्हापासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी न नेमता प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत होती. त्यामध्ये डॉ. विजय खरे, डॉ. ज्योती भाकरे आणि वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके आणि पुन्हा डॉ. प्रफुल्ल पवार यांची नियुक्ती केली.