पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 डिसेंबर आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक नामांकित प्राध्यापकांना संबंधित पदाची आवड आहे. त्यामुळे अनेकांनी अर्ज केले असून, येत्या 12 डिसेंबरपर्यंत आणखी अर्ज येणार असून, संचालकपदासाठी तीव स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकरच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला लवकरच नवीन संचालक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ. महेश काकडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर या विभागाची धुरा प्रभारी संचालकांमार्फतच सांभाळण्यात येत आहे. सध्या मराठी विभागाचे डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे फेबुवारी 2025 पासून या विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. विद्यापीठाने या पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे.
विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा अत्यंत संवेदनशील आणि कामाचा प्रचंड व्याप असलेला विभाग आहे. परीक्षांचे नियोजन, प्रश्नपत्रिका, निकाल वेळेवर लावणे आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करणे, ही कामे अत्यंत जिकरीची असतात. त्यामुळे या पदाला विद्यापीठ वर्तुळात काटेरी मुकुट म्हणून ओळखले जाते. तरीदेखील संबंधित पद महत्त्वाचे असल्यामुळे त्या पदावर बसण्याची अनेक प्राध्यापकांची इच्छा असते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 7 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय अकृषी विद्यापीठांतील घटनात्मक पदांवरील नियुक्तीसाठी नवे निकष निश्चित केले आहेत.
त्यात शैक्षणिक पात्रता आणि मुलाखत यासाठी प्रत्येकी 50 गुण असे एकूण 100 गुण ठरवण्यात आले आहेत. तसेच या नव्या निकषांच्या आधारे विद्यापीठांतील सांविधानिक पदांसाठीची निवड प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिली. त्यामुळे या नवीन निकषांच्या आधारेच विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.