पुढारी वृत्तसेवा
पुणेः पाषाण-बाणेर लिंक रोड जवळील सिंध सोसायटी परिसरात रविवारी पहाटे 4 वाजता बिबट्याचे दर्शन काही लोकांना झाले. भीतीने गाळण उडताच त्या भागातील सुरक्षारक्षकांनी तत्काळ वन विभागाला कळवले. मात्र बिबट्या गायब झाला. वन विभागाने परिसर चारही बाजूंनी सील करीत तब्बल 20 तास शोध मोहीम राबवली, पण बिबट्या मात्र दिसला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
रविवार,दि 23 नोव्हेंबर रोजी सिंध सोसायटी (पाषाण-बाणेर रस्ता ) परिसरात पहाटे 4 वाजता बिबट्याची हालचाल सुरक्षारक्षकांना दिसताच त्यांनी वन विभागासह पोलिसांना माहिती दिली. वनअधिकारी मनोज बारबोले यांनी पहाटे 4 वाजेपासूनच त्याठिकाणी जात शोध मोहीम हाती घेतली. अधिकारी, कर्मचारी रेस्क्यु व्हॅनसह सुरक्षा रक्षकांची मोठी फौज तैनात करण्यात आली. मात्र बिबट्या दिवसभर दिसला नाही. पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. मग रात्रभर त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवून जागते रहो सुरु झाले.
आढळलेल्या बिबट्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुणे वन विभाग व रेस्क्यू टीम सतत घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहीम राबवत आहेत. थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराची काटेकोर तपासणी सुरू आहे. मात्र दिवसभर बिबट्याचे दर्शन झाले नाही.
रविवारी पहाटे 4 नंतर बिबट्या कोणत्याही ठिकाणी विश्वसनीय पुराव्यासह दिसून आलेला नाही. तरीदेखील, वन विभाग पूर्ण दक्षतेने सर्व शक्यता पडताळून पाहत आहे.अशी माहिती अधिकारी मनोज बारबोले यांनी ’पुढारी’शी बोलताना रविवारी रात्री 11 वाजता दिली.
सतर्क राहा, घाबरून जाण्याचे कारण नाही.
कोणतीही अफवा पसरवू नका,
न पडताळलेली माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका.
संशयास्पद हालचाल किंवा बिबट्यासंदर्भातील कोणतीही माहिती आढळल्यास 1926 हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
औंध येथील आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीजवळ रविवारी सकाळी एक बिबट्या दिसला. पुणे वन विभाग आणि आरईएसक्यू सीटी पथके जमिनीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्याला पकडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. सर्व सोसायट्या आणि नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. रविवारी पहाटे 4 वाजेनंतर रात्री उशिरापर्यंत बिबट्या दिसलेला नाही. आमचे पथक रात्री देखील शोध आणि देखरेख करतील. या परिस्थितीबाबत आणखी काही घडामोडी असल्यास आम्ही अपडेट करू.महादेव मोहिते, उप-वनसंरक्षक, पुणे