पुणे : पुढारी वृत्तसेवा
'शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची नियमावली, 5 टक्के खेळाडू आरक्षण तसेच इतर नियमावलींमध्ये आमूलाग्र बदल करून नवे धोरण क्रीडा विभागाला देण्यात येणार आहे,' अशी माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
केदार म्हणाले की, 'राज्यात सध्या थेट नियुक्ती झालेल्या खेळाडूंच्या बनावट प्रमाणपत्रांचा विषय अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच अशा खेळाडूंची यादी तयार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर 5 टक्के आरक्षणांतर्गत खेळाडू भरतीमध्येही बदल करण्यात आला असून, संबंधित खेळाडूने भरतीनंतर सुरुवातीची पाच वर्षे क्रीडा खात्यातच आपली सेवा पूर्ण करायची, असा नियम करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर सर्व नियमावलींमध्येही बदल करण्याचे काम सुरू केलेले आहे.
हरियाणा येथे होणार्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघासमवेत संघाचे पथकप्रमुख म्हणून उपसंचालक अनिल चोरमले हे जाणार आहेत. परंतु, त्यांच्याबाबत आलेल्या तक्रारीमुळे दुसर्या व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन केदार यांनी पत्रकार परिषदेत दिले.