पुणे

भुताचा शोध घेण्यासाठी रात्र घालवली स्मशानात; म.अंनिसचा उपक्रम

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचनजवळील भवरापूर गावच्या स्मशानभूमीत महाराष्ट्र अंनिसच्या पन्नास कार्यकर्त्यांसह नागरिक शनिवारी (दि. 6) रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, भुतांची माहिती जाणून घेतली, त्यांना साद घातली. पण, त्यांना भुते दिसली नाहीत. महाराष्ट्र अंनिसने घेतलेल्या स्मशानभेट कार्यक्रमामधून स्मशानात आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात, हा समज चुकीचा ठरला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापूर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने स्मशानभेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी सातपासून रविवारी सकाळी सातपर्यंत पन्नास जण स्मशानात मुक्कामी होते. या वेळी गावाचे सरपंच सचिन सातव, शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्निल भोसले, माजी सरपंच बबन साठे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. मयूर पटारे, निशांत धाईंजे, प्रवीण खुंटे, रतन नामपल्ले, स्नेहल लांडगे, अनुज भुजबळ, मनोहर पाटील आदींच्या प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.

एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याच्या कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण केले जातात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमाणसात पसरवली जात आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे, असे विशाल यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT