बारामती: महायुती सरकाच्या शपथविधी वेळी छगन भुजबळ यांना डावलले म्हणून आंदोलन करणाऱ्यांनी आता त्यांना मंत्री केल्यावर ढोल का वाजवले नाहीत ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी ३५ वर्षाच्या राजकीय जीवनात कधीही जातीयवाद केला नसल्याचे पवार म्हणाले.
बारामतीत मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी एका कार्यकर्त्याचे नाव घेतले. भुजबळांना मंत्रीमंडळात घेतले नाही तर तुम्ही आंदोलन केले. आता त्यांना मंत्री केले आहे, मग ढोल का नाही वाजवले असा सवाल पवार यांनी केला. अजित पवार कधीही जातीयवाद करत नाही. मी जातीयवाद करतो असे सांगणारा कोणीही मायचा लाल दाखवा. ३५ वर्षात मी कुठे जातीयवाद केला हे दाखवून द्या. एवढे सगळ्यांनी मी बरोबर घेवून जातोय. मार्ग काढतोय. वेगवेगळ्या संधी देतोय तरी तुम्ही आंदोलन करता.
छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात संधी दिली असली तरी त्यांना राज्यसभेत मी पाठवणार आहे. शेवटी प्रमुख नेत्यांना योग्य तो मानसन्मान दिलाच पाहिजे. माहिती घ्यायची नाही.. काही नाही.. अन आंदोलन करत सुटायचे. आणि त्या आंदोलनावेळी आपण फोटोत दिसू नये म्हणून काही जण तर तोंड लपवत मागे थांबायचे काम करत होते. मी कधी असे लपूनछपून राजकारण केले का ? असे म्हणत पवार यांनी टोलेबाजी केली.