पुणे: स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत स्पा मॅनेजर, जागामालक यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, मंद प्रकाशातील या व्यवसायाला खर्या अर्थाने अभय देणारे आणि हा व्यवसाय चालविणारे खरे सूत्रधार अद्याप मोकाटच असल्याचे दिसून येते. त्यामुळे पडद्यामागील या सूत्रधारांना कोण लगाम लावणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेली देहविक्रीची दुकाने दिवसेंदिवस फोफावत चालली असून, त्या तुलनेत पोलिस कारवाई तोकडीच असल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांत केवळ बाणेर आणि विमानतळ या दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 23 तरुणींची सुटका करण्यात आल्याने, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाची व्यक्ती शहरात किती मोठी असल्याचे दिसते. (Latest Pune News)
आत्तापर्यंत पोलिसांनी स्पा मधील वेश्याव्यवसायाबाबत स्पा मॅनेजर, मालक यांच्यावर कारवाई केली आहे. तर अपवादात्मक जागा मालकावरदेखील जागा भाड्याने दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. परंतु, खर्या अर्थाने शहरात स्पा सेंटरच्या आडून देहविक्रीची दुकाने थाटणाऱ्या सूत्रधारावर कारवाई होताना दिसून येत नाही.
प्रत्यक्षात जरी हे लोकं स्पा सेंटर चालवित नसले तरी, येथे कामासाठी येणार्या तरुणी पुरविणे आणि स्पाचे पडद्यामागून व्यवस्थापन करण्याचे हे करत असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने तीन लोकांच्या हातात शहरातील हा स्पा सेंटर मधील देहविक्रीची व्यवसाय असल्याचे समजते. परंतु, त्यांच्यावर अद्यापर्यंत पोलिसांकडून कधी कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
व्हिसा पर्यटनाचा अन् नोकरी स्पामध्ये
राज्य,परराज्यासह विदेशी तरुणी स्पा सेंटरमध्ये काम करताना दिसून येतात. पैशांचे आमिष दाखवून त्यांना स्पा मालकांकडून वेश्याव्यसायासाठी प्रवृत्त केले जाते. प्रामुख्याने काही ठराविक देशातील तरुणी शहरामधील स्पा सेंटरमध्ये काम करताना दिसून येतात. ते काम करत असलेल्या स्पा मध्ये ग्राहक देखील मोठ्या संख्येने येतात.
परंतू या तरुणी भारतात येताना, पर्यटन किंवा अन्य व्हिसावर ठरावीक कालावधीत येतात. येथे आल्यानंतर त्यांच्याकडून व्हिसा नियमांचे उल्लंघन करून स्पामध्ये काम केल्याचे दिसते. विमानतळ पोलिसांनी स्पावर केलेल्या कारवाईत दहा विदेशी तरुणींची सुटका करण्यातआली होती.