परिंचे: दक्षिण पुरंदरमधील वीर, परिंचे, माहूर, तोंडल व काळदरी खोऱ्यातील वाड्यावस्त्यांवर व्हायरल रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून या भागात कडाक्याची थंडी पडत आहे. दिवसभरही वातावरण थंड व दमट स्वरूपाचे असते. त्यामुळे सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब अशा विविध आजारांनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. कधी ढगाळ, तर कधी कडक ऊन, तर कधी प्रमाणापेक्षा जास्त गारवा अशा वातावरणामुळे व्हायरलच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वातावरणबदलामुळे पेशी कमी-जास्त होणे, थकवा जाणवणे, टायफॉईड व डेंगी अशा विविध आजारांनी डोके वर काढले आहे.
हृदयविकाराचाही मोठा धोका
या थंडीच्या लाटेमध्ये व्हायरल इन्फेक्शन होण्यासह हृदयविकाराचाही धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या किंवा त्याची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने थंडीच्या दिवसात योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन वीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. प्रकाश राठोड यांनी केले आहे.
सध्याच्या थंडीच्या वातावरणात डोकेदुखी, जेवण न जाणे पेशी कमी जास्त होणे, टायफॉईड, डेंगी, कावीळ असे आजार रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ लागले आहेत. वेळीच उपचार केले तर रुग्णांना दोन-चार दिवसांत आराम मिळतो. या काळात रुग्णांनी वेळेवर पोटभर जेवण करावे, तर तळलेले, उघड्यावरचे शिळे अन्नपदार्थ टाळावेत. जास्त पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा. दुखणे अंगावर काढू नये.डॉ. नितीन माने, सासवड
वाढत्या थंडीमुळे दुभत्या जनावरांना न्यूमोनिया, लाळ्या-खुरकत आणि अतिसार यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. थंडीमुळे दुधाच्या उत्पादनात घट होण्याची व विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी कोमट पाणी, सकस आहार आणि उबदार गोठ्याची आवश्यकता भासते. जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य काळजी घ्यावी.रवींद्र धुमाळ, पशुचिकित्सक, वीर