कसबा पेठ: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील बाजारात ठिकठिकाणी बाप्पांच्या मूर्तींचे स्टॉल सजू लागले आहेत. यंदा छाव्यावर आरूढ झालेल्या बाप्पांच्या मूर्तीसह साऊथ पॅटर्नमधील विविध रंगांतील गणेश मूर्तीं, तसेच मुंबईच्या धर्तीवर तयार केलेल्या मूर्तींच्या बुकिंगला भाविकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, यंदा बाप्पांच्या मूर्तींच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारात सध्या विविध रूपांतील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमीच्या मुहूर्तावर भाविकांनी मूर्तीचे बुकिंग करण्यास सुरुवात केल्याचे कसबा पेठेतील तांबट हौद परिसरातील विक्रेत्यांनी सांगितले. दरवर्षी बाजारात विविध प्रकारच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असतो. यंदा पारंपरिक गणेशमूर्तीच्या बुकिंगकडे भाविकांचा कल दिसून येत आहे. (Latest Pune News)
छाव्यावर विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, साऊथ पॅटर्नमधील चिक्कू रंगाच्या मूर्ती, मुंबईच्या धर्तीवर तयार केलेल्या मूर्ती बुकिंग करण्यास भाविक प्राधान्य देत आहेत. तसेच आसनमांडी, चौरंग, उंदीर, म्हैसुरी गणपती यांसह पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, शारदा गणेश आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या पारंपरिक मूर्तींच्या प्रतिमा बुकिंग करण्याकडेही भाविकांचा कल आहे. मूर्तींचे डोळे, रंग, पितांबर आणि मुकूटासह विविध बाबींकडे भाविक बारकाईने लक्ष देत आहे. तसचे पेणच्या गणेश मूर्तींही बाजारात दाखल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पीओपी मूर्तींची आवक कमी
बाजारात यंदा पीओपी मूर्तींची आवक कमी प्रमाणात झाली आहे. कच्चा मालाचे दर वाढल्याने बाप्पांच्या मूर्तींच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. बाजारात 700 रुपयांपासून 21 हजार रुपयांपर्यंत किंमतीच्या मूर्ती सध्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमीपासून आम्ही मूर्तींचे बुकिंग सुरू केले आहे. यावर्षी गणेशमूर्ती विक्रीतून मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
छाव्यावर विराजमान झालेले बाप्पा, साऊथ पॅटर्नमधील विविध रंगातील धोती गणेश आणि चिक्कू कलरमधील मूर्तींच्या बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्ती बुक केल्यानंतर भाविकांच्या आवडीनुसार धोतर, शाल, पुणेरी पगडी, तसेच भाविकांच्या मनपसंतीनुसार रंगात बदल करण्याचे नियोजन केले जात आहे. मूर्तींच्या पितांबराचा रंग भाविकांच्या आवडीनुसार उपलब्ध करून दिला जात आहे.- लाला दवे, मूर्ती विक्रेते, कसबा पेठ.
मुंबईतील गणेश गल्ली, लालबाग, खैरेवाडी येथील बाप्पांच्या धर्तीवर बनविलेल्या गणेश मूर्तींच्या बुकिंगला यंदा भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच रत्नजडीत दागिने, पितांबर, पारंपरिकता या बाबींकडेही भाविक मूर्तींचे बुकिंग करताना विशेष लक्ष देत आहेत.- सचिन डाखवे, मूर्ती विक्रेते, कसबा पेठ.