

पुणे: जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीला गती द्या, एकही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.
व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणार्या योजना, नगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असेल्या रमाई घरकुल वस्ती योजना, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्यांच्या समस्या, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पाबाबत पात्र व अपात्र नागरिकांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. (Latest Pune News)
या वेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, नगरपरिषद जिल्हा प्रशासन अधिकारी व्यकंटेश दुर्वास, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
अडसूळ म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने बेघर नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी योजना राबविण्यात येत आहेत, याबाबत नगरपालिका क्षेत्रात व्यापक जनजागृती करावी.
या विविध योजनांच्या माध्यमातून बेघर नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याकरिता नगरपरिषदेने सर्वेक्षण करावे, जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावे, अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणार्या घरकुल योजनांकरिता दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे निधी खर्च करावा. रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मागणीबाबतचे प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे.
सफाई कर्मचार्यांचे जीवनमान उंचावून त्यांची प्रगती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचार्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पाबाबत नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर पात्र कर्मचार्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात यावी.
मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्ती, पदोन्नतीच्या अनुषंगाने प्रलंबित विषय मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असेही अडसूळ म्हणाले. जिल्ह्यात तळेगाव दाभाडे नगरपालिकेने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उत्तम काम केले असून इतरांनी एक मॉडेल स्वरुपात स्वीकारले पाहिजे. सफाई कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने निर्देश दिले.