पुणे

फसवून हक्कसोडपत्र सादर करून आईची फसवणूक; मुलाला दणका

अमृता चौगुले

महेंद्र कांबळे

पुणे : आई आणि बहिणीला न सांगताच परस्पर जमीन विकणार्‍या मुलाला 'भरोसा सेल'ने दणका दिला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार एक कोटी रुपये किंमत असलेली सात गुंठे वडिलोपार्जित जमीन भरोसा सेलने वृद्ध आईला परत मिळवून दिली आहे.

तक्रारदार आईने मुलाने फसवणूक केल्या प्रकरणात न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. पतीचे 2017 मध्ये दुर्धर आजाराने निधन झाले. त्यानंतर मुलाचा डोळा त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर होता. त्यांना थोडी फार रक्कम देऊन सर्व मालमत्ता आणि रक्कम हडपण्याचा त्याचा डाव सुरू
होता. त्या पद्धतीने घरात वर्तवणूकही सुरू झाली होती. सुनेकडून होणारी हेळसांड त्याला दिसत असताना त्याने आपल्या पत्नीला कधीही तसे करण्यापासून रोखले नाही. महिलेला स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागत होते. तिने स्वयंपाक केला की सून आदळआपट करत होती. नणंद आल्यावर तिला अपशब्द वापरणे, तक्रारदार महिला समोर दिसली की दार आदळणे, असे सर्व प्रकार सुरू होते.

फसवून घेतल्या सह्या

एक दिवस मुलाने दोन्ही बहिणींना आणि आईला जमिनीच्या व्यवहाराचे पैसे मिळणार आहेत, असे सांगून एका ऑफिसमध्ये नेले. त्यांना काहीही न सांगता त्यांच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या. त्यावेळी त्याने कोणतीही रक्कम दिली नाही. नंतर त्याने त्यांना प्रत्येकी पाच लाख दिले. त्यातीलही त्याने 33 हजार रुपये घेतले. परंतु गावाकडे रस्त्यालगत असलेल्या जमिनीबाबत त्याने आईला माहिती देण्यास टाळाटाळ केली.

Bharosa Sale

भरोसा सेलकडे धाव

सध्या ज्येष्ठ नागरिक असलेली ही महिला एकटी राहत आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. याचदरम्यान नुकताच गावाला गेल्यानंतर त्यांना त्यांच्या व्यवहार न झालेल्या जमिनीत बांधकाम होत असल्याचे दिसले. त्यांनी त्याबाबतची कागदपत्रे मिळवली असता फेरफारमध्ये मुलाने आईचे आणि बहिणींचे हक्कसोडपत्र दिल्याचे आढळले. याबाबत त्याला विचारणा केल्यानंतर त्याने आईला आणि बहिणीला मी तुमची फसवणूक केली असल्याचे सांगून तुम्हाला काय करायचे ते करा म्हणून धमकावले. आपली फसवणूक झाल्याने आईने भरोसा सेलमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक योगिता बोडखे आणि किशोरी केंगळे यांची भेट घेतली.

योगिता बोडखे यांनी तक्रारदार महिलेच्या मुलाला बोलवून घेत कायदा समजाऊन सांगितला. मुलाचे मनपरिवर्तन केले. त्याने आईला सात गुंठे जमीन कागदपत्रासह परत केली. तक्रारदार ज्येष्ठ महिलेने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक योगिता बोडखे यांचे आभार मानले.

जमीन व्यवहारात मुलाकडून आपली फसवणूक झाल्याने ज्येष्ठ नागरिक महिलेने भरोसा सेलकडे धाव घेतली होती. अर्ज वाचल्यानंतर तिच्या तक्रारीत तथ्य वाटल्याने आम्ही तिच्या मुलाला बोलावून घेतले. त्याला ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत समजावून सांगितले. त्याचे समुपदेशन झाल्यानंतर त्याने आईला 7 गुंठे जमिनीची कागदपत्रे परत केली.
– योगिता बोडखे, सहायक पोलिस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक कक्ष, भरोसा सेल.

SCROLL FOR NEXT