Shirur Crime file photo
पुणे

Shirur Crime: मुलानेच केली आईची हत्या; निमगाव म्हाळुंगीतील धक्कादायक घटना

खुनानंतर आईचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला.

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे मुलानेच आईला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १५) उघडकीस आली. खुनानंतर आईचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला.

मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून खुनाची घटना उघड झाली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलीप राघोबा चौधरी (रा. चौधरीवस्ती, निमगाव म्हाळुंगी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

कुंदा राघोबा चौधरी (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ठाण्यात याबाबत भास्कर दशरथ कबाडी (वय ५५, रा. कबाडवाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप चौधरी हा आई कुंदा चौधरी यांना नेहमी त्रास देत असल्याने त्या आपल्या भाऊ व बहिणीकडे राहत होत्या.

मंगळवारी (दि. १४) दिलीप हा जुन्नर तालुक्यातील मामाच्या व मावशीच्या घरी गेला. यापुढे आईला कोणताही त्रास देणार नाही, असे सांगून त्याने आईला पुन्हा घरी आणले. घरी आल्यानंतर सायंकाळी त्याने आईला बेदम मारहाण केली. शेजाऱ्यांनी याची माहिती कुंदा चौधरी यांचे भाऊ भास्कर कबाडी यांना दुरध्वनीवरून दिली. मात्र, तोपर्यंत कुंदा चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंतराव गिरी घटनास्थळी दाखल झाले. दिलीप चौधरी हा आईचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगत होता.

त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, मृत महिलेच्या शरीरावरील गंभीर जखमांच्या खुणा पाहून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दिलीप चौधरी याला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT