सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२०२६च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ऊसदरापोटी उर्वरित रक्कम तसेच सभासदांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम बँक खात्यांवर वर्ग केली आहे.
याशिवाय कारखान्याच्या कायम व हंगामी कामगारांना १५ टक्के बोनस ॲडव्हान्स, रोजंदारी आणि ट्रेनी कामगारांना दिवाळीभेट, वेतनवाढीच्या फरकाचा पहिला हप्ता आणि रजेचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सभासद शेतकरी आणि कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ऊस उत्पादकांना सर्वोच्च ऊसदर जाहीर केला होता. त्यानुसार कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगरसभासद शेतकऱ्यांच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांत तुटणाऱ्या उसासाठी प्रतिटन ३ हजार ८०० रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसासाठी प्रतिटन ३ हजार ९०० रुपये, तर मार्चमध्ये तुटणाऱ्या उसासाठी प्रतिटन ४ हजार रुपये ऊसदर जाहीर करण्यात आला होता.
कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३ हजार ४०० रुपये अंतिम ऊसदर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यापूर्वीच प्रतिटन ३ हजार ३०० रुपये पहिली उचल आणि अनुदानाची रक्कम बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.
आता सभासद व बिगरसभासद ऊस उत्पादकांना उर्वरित प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे एकूण ६०.११ कोटी रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ९६ लाख रुपये बँक खात्यांवर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
सभासदांच्या ठेवीवरील व्याजाचेही वितरण
कारखान्याने सन २०२०-२०२१ मध्ये प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे कपात केलेली ठेव रक्कम व त्यावरील व्याज असे एकूण २४.१५ कोटी रुपये सभासदांच्या बँक खात्यांवर वर्ग केले आहेत. तसेच, सन २०२३-२०२४ मधील ठेवींवरील व्याजापोटी ४.०० कोटी रुपयेही वितरित करण्यात आले आहेत.
कामगारांना बोनस, दिवाळीभेट
कारखान्याच्या कायम व हंगामी कामगारांसाठी १५ टक्के बोनस अॅडव्हान्सपोटी ३.३३ कोटी रुपये, तर रोजंदारी आणि ट्रेनी कामगारांना प्रत्येकी ८,५०० रुपयांप्रमाणे दिवाळीभेट म्हणून २९.०० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, कामगारांच्या वेतनवाढीच्या फरकाचा पहिला हप्ता म्हणून १.८४ कोटी रुपये आणि रजेच्या पगारापोटी २८.०० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
१२ ते १२.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
कारखान्याचा सन २०२६-२०२७ चा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. आजअखेर ६१ हजार ५२० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ५४ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
चालू गाळप हंगामासाठी कार्यक्षेत्रात ३८ हजार ५०० एकर क्षेत्रावर ऊस लागवड झाली असून, त्यातून अंदाजे १२ ते १२.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले