Someshwar Sugar Factory Election Result: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी (दि. १२) माळेगाव येथील अजिंठा बँक्वेट हॉलमध्ये सुरुवात झाली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी ब वर्ग गटातून विजय मिळवला.
संग्राम सोरटे यांनी ब वर्ग गटातून ९३ मते मिळवत विजय नोंदवला. या गटातून विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर पॅनेलचे महेश राणे निवडणूक लढवत होते. मात्र, या लढतीत सोरटे यांनी बाजी मारली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलसमोर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे आव्हान आहे. मतमोजणीच्या पहिल्या निकालात संग्राम सोरटे यांनी विजय मिळवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकीसाठी सुमारे ८४ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतमोजणीदरम्यान इतर गटांचे निकाल काय लागतात, याकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिलीच निवडणूक असल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. सुनेत्रा पवार यांनी आठ दिवस कार्यक्षेत्रात तळ ठोकला, तर जय पवार यांनी प्रचारासाठी दौरे केले आणि पार्थ पवार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी गावागावांतील संपर्काच्या जोरावर निवडणूक लढवली. योगेंद्र पवार यांनीही या निवडणुकीतून आपले राजकीय अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला.