Someshwar Sugar Factory Pudhari
पुणे

Someshwar Sugar Factory Election: “बारामतीच्या राजकारणात नवे समीकरण? सोमेश्वर कारखाना निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे थेट आव्हान”

“पक्षातील तालुका व गावपातळीवरील नेत्यांच्या बंडखोर भूमिकेमुळे बारामतीच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात”

पुढारी वृत्तसेवा

सुहास जगताप

पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात पहिल्यादांच दिवंगत अजितदादा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षातील तालुका, गावपातळीवर ज्यांची गणना होऊ शकेल, अशा नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले आहे. बारामतीत प्रथमच पवार नावाच्या 'पॉवर सेंटर'ला यामुळे धक्का बसला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या समोर ब्र काढण्याची ज्यांची हिंमत होत नव्हती, त्यांनीच बंडाचे निशान फडकावले आहे. पवार नावाच्या'पॉवर सेंटर'ची ताकद कमी होत चालल्याची ही नांदी नव्हे ना..! अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपची मदत घेत नाराजीची काही फुटकळ कारणे देत थेट अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच आव्हान दिले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल या निवडणुकीत असताना त्याच पक्षाचे पुरंदर तालुक्यातील नेते सुदामराव इंगळे आणि माणिकराव झेंडे यांनी जगतापांना साथ दिली. अजितदादांच्या पक्षातील असंतोषाचा फायदा राज्यात त्या पक्षासह सत्तेत असलेल्या भाजपने चांगला उठविला आहे.

राज्य, देशपातळीवर राजकारणात अतिशय शक्तिशाली कुटुंब म्हणून पवार कुटुंबाची ओळख आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजितदादा यांनी ही ओळख निर्माण करताना बारामतीमध्ये एकछत्री अंमल बसविला होता, कोणत्याही निवडणुकीत हे दोन नेते म्हणतील तेच बारामतीमध्ये होत आहे, अलीकडच्या काळात अजितदादा म्हणतील ते होत असे दादांच्या समोर कोणाचीही ब्र काढण्याची हिंमत नव्हती आणि आता 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत फुटकळ लोक डाेळे दाखवू लागले आहेत, याचा पवारांच्या दोन्ही गटांनी विचार करण्याची गरज आहे.

अजित पवारांच्या नंतर आणि शरद पवार यांच्यावर वयामुळे आलेल्या मर्यादांचा विचार करता आता पवारांच्या पुढच्या पिढीने या'पॉवर सेंटर'चा दरारा कायम ठेवण्याची गरज होती, परंतु तसे होताना दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT