सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा चालू गाळप हंगाम मार्च महिन्यातच संपण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यासाठी जाहीर केलेले अनुदान नेमके कोणाला दिले जाणार? असा सवाल शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी उपस्थित केला. कारखान्याच्या अनुदान धोरणामुळे सभासदांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे एप्रिलचे अनुदान प्रत्यक्षात कागदावरच राहणार का, याबाबत संभम निर्माण झाला आहे.
कारखान्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून विस्तारवाढ केली असून, सध्या 10 हजार मे. टन क्षमतेने गाळप सुरू आहे. 15 डिसेंबरपर्यंत 4 लाख मे. टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप झाले आहे. तर उर्वरित हंगामात सरासरी गाळप गृहीत धरता मार्चअखेरपर्यंतच नियोजित गाळप पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष गाळप होणार नसल्यास त्या कालावधीसाठी जाहीर केलेले अनुदान कोणत्या उसावर व कोणत्या सभासदांना दिले जाणार? असा प्रश्न काकडे यांनी उपस्थित केला आहे.
सतीश काकडे म्हणाले की, एप्रिल महिन्यात गाळपच नसताना प्रति मे. टन 300 रुपये अनुदान जाहीर करणे म्हणजे केवळ आकडेवारीची घोषणा असून, प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामुळे अनुदानाची घोषणा ही फसवी आहे.
सध्या सुरू, पूर्वहंगामी व खोडवा ऊस मोठ्या प्रमाणावर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर इतर कारखान्यांकडे गाळपासाठी जात आहे. हा ऊस थांबवण्यासाठी जानेवारी-फेबुवारीपासूनच अनुदान जाहीर करणे गरजेचे होते, याकडेही काकडे यांनी लक्ष वेधले.
खोडवा उसाला योग्य दराने अनुदान दिले गेले असते, तर कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर गेला नसता. आणि कारखान्यालाही अपेक्षित गाळप मिळाले असते. मात्र सध्याच्या धोरणामुळे प्रत्यक्ष गाळप काळातील उसाला फारसा लाभ न होता, हंगाम संपल्यानंतरच्या एप्रिल महिन्याचे अनुदान केवळ घोषणेपुरतेच मर्यादित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने अनुदान धोरणाचा फेरविचार करावा. प्रत्यक्ष गाळप कालावधीत येणाऱ्या उसाला अनुदान जाहीर करावे. तसेच अनुदान केवळ सभासद शेतकऱ्यांनाच देण्यात यावे, गेटकेनधारकांना देऊ नये अशी मागणीही काकडे यांनी केली आहे.