सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 29) दुपारी 1 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील प्रांगणात पार पडणार आहे. सभेसाठी सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले आहे.(Latest Pune News)
गतवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेचे सन 2024-25 या वर्षाचा संचालक मंडळाकडून आलेला अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके दाखल करून घेणे व त्याचा स्वीकार करणे, सन 2024 -25 या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजुरी देणेबाबत विचार करणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व त्यांनी सुचविलेल्या भांडवल उभारणीबाबतची नोंद घेणे,
वैधानिक लेखापरीक्षक यांनी कारखान्याच्या सन 2024-25 या वर्षाच्या दिलेल्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व मागील सन 2023-24 या वर्षाचा लेखापरीक्षण अहवालाचा संचालक मंडळाने सादर केलेला दोषदुरुस्ती अहवाल स्वीकारणे, यासह सन 2025 -26 या वर्षाकरिता शासनमान्य लेखापरीक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे या विषयांवर चर्चा होणार आहे.
या शिवाय सिरपपासून इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यातील यंत्रसामग््राीमध्ये करावयाचे बदल व त्यासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चास मंजुरी देणे, कारखाना साखर गोदामाची दुरुस्ती, सौरउर्जा प्रकल्प उभारणे, त्याच्या अंदाजीत खर्चास मान्यता देणे, सहवीजनिर्मिती विस्तारवाढ प्रकल्पाचे भांडवली खर्चाची नोंद घेऊन त्यास मंजुरी देणे, कारखाना स्क्रॅप मालाची विक्रीची नोंद घेणे या विषयावर सभासद चर्चा करणार आहेत. दरवर्षी रात्री उशिरापर्यंत चालणारी सोमेश्वरची वार्षिक सभा चालू वर्षी मात्र लवकर आटोपण्याची शक्यता आहे.