सोलापूर / पुणे; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक व्यवहारातील वादातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. वैशाली पोशंटी शिंदे (वय ३०, रा. मोहोळ, जि. सोलापूर), रेश्मा समीर शेख (वय ३०, रा. कात्रज) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी करिश्मा गोटुराम काळे उर्फ करिश्मा राजू पवार (वय २०, रा. चिखली, जि. सोलापूर) हिच्यासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अंजली सिद्धेश्वर शिंदे (वय २१, रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) हिने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजील शिंदे आणि संशयित आरोपी करिश्मा काळे यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला. करिश्मा अंजलीकडे पैसे मागत होती. तीन दिवसांपूर्वी अंजली नातेवाईकांना भेटण्यासाठी एसटी बसने पंढरपूरकडे जात होती. त्यावेळी संशयित आरोपी करिश्मा आणि अंजलीची बसस्थानकात भेट झाली. करिश्माने वैशाली आणि रेश्मा यांच्याशी संगनमत करून अंजलीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. याबाबत अंजलीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून वैशाली आणि रेश्मा यांना कात्रज परिसरातून अटक केली. अपहरण केलेल्या मुलीला मोहोळमधून ताब्यात घेवून तिच्या आईकडे दिले आहे, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा :