पुणे

विश्वगुरू होण्यासाठी सामाजिक विकास गरजेचा! नितीन गडकरी यांचे मत

अमृता चौगुले

पुणे : आपण आर्थिक सत्ता म्हणून उदयास नक्की येऊ, परंतु आपल्याला जर विश्वगुरू व्हायचे असेल आणि मार्गदर्शन करायचे असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक विकास करून मूल्याधिष्ठीत जीवनपध्दती विकसित करावी लागणार आहे. आपल्याकडे इतिहास, संस्कृती आणि विरासतीने मिळालेले ज्ञान आहे. त्याच्या आधारावर भारतीय समाज घडविणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मारवाडी फाउंडेशन नागपूरचा सन 2023 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार केंद्रीय रस्ते, महामार्ग व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी शांताराम मुजुमदार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार श्रीनिवास पाटील, मोहन जोशी, विठ्ठल मणियार, अ‍ॅड. अभय छाजेड, डॉ. शां. ब. मुजुमदार, मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती आणि विकास हा आपल्या देशाच्या विकासाचा प्रमुख मापदंड आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने आर्थिक विकास महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर त्या देशाचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास किती झाला हेदेखील महत्त्वाचे आहे. विकास हा एकांगी होऊन चालणार नाही. तो सर्वच क्षेत्रात झाला पाहिजे. तो करायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे आहेत.

खासदार आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर श्रीनिवास पाटील यांच्याकडे बघत हे शरद पवारांच्या फार जवळचे आहेत. पूर्वी मीदेखील जवळचा होतो. पण सध्या मी नरेंद्र मोदी आणि गडकरी यांच्या जवळचा आहे. राजकारणात कोण कधी कोणाजवळ जाईल सांगता येत नाही. राजकारणात जिथे फायदा आहे तिथे गेले पाहिजे. मी तुमच्याकडे होतो, पण मला तिकडे आता फायदा वाटत नाही. तसेच 2024 ला आम्हीच निवडून येणार असल्याचा उल्लेखदेखील आठवले यांनी केला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अभय छाजेड, मोहन जोशी यांच्यासह मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. बाळ कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT