स्मार्ट वीजमीटरने ग्राहकांना सातपट वाढीव बिले!  Pudhari
पुणे

Smart Meter Issue: स्मार्ट वीजमीटरने ग्राहकांना सातपट वाढीव बिले!

भेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची परिसरात महावितरणविरोधात संताप

पुढारी वृत्तसेवा

फुरसुंगी: भेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाचीसह परिसरात महावितरण कंपनीने बसविलेल्या टी. ओ. डी. स्मार्ट वीजमीटरमुळे सातपट वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही बिले कमी करून मिळावीत आणि स्मार्ट मीटर बसविणे तत्काळ थांबवावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

वाढीव वीजबिलामुळे भेकराईनगर परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली असून, त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर जाऊन याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला. नवे मीटर बसविण्यापूर्वी हजार रुपये बिल येत होते, आता सहा-सात हजारांपेक्षा जास्त बिल येत आहे. (Latest Pune News)

मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अचानक वाढलेले बिल आणि महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात वेळेवर बिल भरले नाही, तर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत.

याबाबत माजी नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले की, परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याअगोदर ज्यांना 700 ते 1500 वीज बिल येत होते, त्यांना आता 7 हजार ते 14 हजार बिल येत आहे. ज्यांचा पगारच 10 ते 15 हजार आहे, त्यांनी वीज बिल भरून कुंटुबाच्या उदानिर्वाहाचा खर्च कसा करायचा, काय खायचे आणि मुलांना शाळा कशी शिकवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणने ग्राहकांची बिले तातडीने कमी करून द्यावी आणि स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे, यासाठी नागरिकांच्या वतीने स्थानिक आमदार आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या कडेही पाठपुरावा केला जाणार आहे.

...मग आधीचे मीटर सदोष कसे?

वाढीव वीजबिलांबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आधीचे मीटर फॉल्टी होते, त्यामुळे वीजबिल कमी येत होते, असे अजब उत्तर दिले. मात्र, आधीचे मीटर ग्राहकांनी बाजारातून विकत आणले नव्हते, तर ते महावितरण कंपनीनेच बसविले होते, मग ते सदोष कसे, असा सवाल माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी उपस्थित केला आहे.

काही जुन्या मीटरच्या बॅचमध्ये दोष दिसून येत असल्याने संबंधितांना कमी बिल येत होते. मात्र, आता स्मार्ट मीटर बसविल्यामुळे अचूक रीडिंग येत आहे. ज्यांना खरोखरच वाढीव बिले आली आहेत, त्याची तपासणी करून त्यांना योग्य बिले दिली आहेत.
- रामचंद्र लोंढे, अतिरिक्त अभियंता, महावितरण, फुरसुंगी कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT