जळोची(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या बारामती-भिगवण रस्त्याचे सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हे काम स्थानिकांसह वाहनचालकांसाठी डोकेदुखी झाली आहे. रस्त्यावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी होत आहे.
बारामती-भिगवण रस्ता सुखकर करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची होती. त्यानुषंगाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील डायनामिक्स डेअरी ते खानोटा पुलापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या रस्त्यावर काम करीत असताना ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजू उखडून काम सुरू केले, तर एका बाजूच्या काँक्रीटचे काम सुरू आहे. हे करीत असताना पूर्ण रस्त्यावर खडी पसरली आहे व पाणी मारले जाते, त्यामुळे रस्ता निसरडा होत आहे.
रस्त्याच्या दुसर्या बाजूला खड्डे, माती, खडीचा राडा पडलेला आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच मोठ्या वाहनांच्या चाकाच्या टायरखाली खडी येत असल्याने ते उडून शेजारून जाणार्यांना लागून जखमा होत आहेत. अशावेळी चालकाचे नियंत्रण सुटून अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेकदा वाहने घसरत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे.
हेही वाचा