पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोच्या पार्किंगसाठी वल्लभनगर आगाराची जागा वापरण्यात आली आहे. त्या ऐवजी वल्लभनगर आगारातील रस्त्याची, केबलची, स्टाफ रूमची आदीसह चार कोटींची कामे करून देण्याचे ठरले आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. एसटीच्या अभियांत्रिकी विभागाचे त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. तेथे राम भरोसे कारभार सुरू आहे. याचा त्रास आगारातील प्रवासी तसेच एसटीच्या कर्मचार्यांना होत आहे. मेट्रोच्या वल्लभनगर स्थानकाच्या पार्किंगसाठी आगाराची 20 ते 25 गुंठे जागा देण्यात आली आहे.
या जागेच्या ऐवजी मेट्रोकडून आगारातील स्टाफ रूम, रस्त्याचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. आगारामधून निघाल्यावर एकदम मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी मार्ग बनविला जाणार आहे. मात्र एप्रिलमध्ये सुरू झालेले काम तीन महिने झाले तरी अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याचे दिसून येत आहे. आगारात सुरू असलेले मेट्रोचे काम, कोणत्या पद्धतीने आणि कसे सुरू आहे, हे पाहणे आवश्यक आहे. त्याची मुख्य जबाबदारी अभियांत्रिकी विभागाची आहे. मात्र त्याकडे अभियांत्रिकी विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा :