Siya Goyal Family Business FDA Pune Pudhari
पुणे

Siya Goyal Family Business: सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई; FDAने थेट व्यवसायच बंद केला, 8 लाखांचा माल जप्त

Siya Goyal Family Business: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या 'बी. जी. गोयल अँड कंपनी' या दुकानावर FDA ने मोठी कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Siya Goyal Family Business: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या व्यवसायावरही आता कारवाईची टांगती तलवार आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या 'बी. जी. गोयल अँड कंपनी' या मसाले आणि सुका मेवा विक्री करणाऱ्या दुकानावर मोठी कारवाई करत पुढील आदेश येईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या या दुकानाची FDA च्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तपासादरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, उत्पादनांच्या लेबलिंगमधील त्रुटी आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा संशय आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी 'संत' आणि 'साधू' ब्रँडच्या हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन वड्या यांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच सुमारे 4,172 किलो अन्नसाठा, ज्याची अंदाजे किंमत 8.14 लाख रुपये आहे, तो जप्त करण्यात आला.

FDA च्या प्राथमिक तपासात काही उत्पादनांवरील लेबलवर अपुरी माहिती किंवा चुकीची माहिती असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय काही उत्पादनांमध्ये भेसळीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेले नमुने आता प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

याशिवाय, खाद्य सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FSS Act) आवश्यक असलेल्या नियमांचे पालन न करणे तसेच परवान्याशी संबंधित आवश्यक दुरुस्त्या वेळेत न केल्याचेही FDA च्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित दुकानाल पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व व्यावसायिक व्यवहार थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, हे प्रकरण चर्चेत येण्यामागे केतन अग्रवाल हत्या प्रकरण आहे. पोलिसांच्या तपासानुसार, 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी सियाचा होणारा नवरा केतन अग्रवाल याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत केतन अग्रवालचा मृत्यू झाला असून सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मात्र, FDA ने स्पष्ट केले आहे की सध्या करण्यात आलेली कारवाई ही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि परवाना प्रक्रियेमधील त्रुटींशी संबंधित आहे. या कारवाईचा केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाशी थेट संबंध नसून, तपासादरम्यान आढळलेल्या कथित नियमभंगाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT