पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनाअभावी अपूर्ण राहिलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून 'मिसिंग लिंक' जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून, सहा ठिकाणच्या लिंक जोडण्यासाठी जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 33 मिसिंग लिंक जोडण्यात येणार आहेत. यामध्ये नवले पुलाजवळील सेवा रस्त्याला पर्यायी रस्त्याचाही समावेश आहे.
शहराचा आकार, लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य शहरासह उपनगरांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि लहान-मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. मात्र, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने कोंडीत भर पडत आहे.
विकास आराखड्यात (डीपी) दाखवलेल्या रस्त्याची संपूर्ण जागा ताब्यात आली तरच त्या रस्त्याचा पूर्ण वापर करता येतो अन्यथा लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्ता वापराविना पडून राहतो.
डीपीमध्ये समावेश असलेले अनेक रस्ते भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडलेले आहेत. महापालिका हद्दीत 520 कि. मी. लांबीचे रस्ते तुकड्या तुकड्यामध्ये 700 ठिकाणी रखडले आहेत. रखडलेले रस्त्यांमध्ये 0 ते 100 मी, 100 ते 500 मी, 500 ते 1000 मी. आणि एक कि.मी. लांबीच्या पुढे अशा रस्त्यांचा समावेश आहे.
'दैनिक पुढारी'ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेने या मिसिंग लिंक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 0 ते 100 मीटर अंतराचे प्राधान्य क्रम ठरवून पहिल्या टप्प्यात 33 मिसिंग लिंक जोडण्यात येणार आहेत. यापैकी सहा जागा ताब्यात घेतल्या आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे वाहतूक व्यवस्थापक निखिल मिजार यांनी सांगितले.
या मिसिंग लिंक जोडणार
- मगरपट्टा ते हनीवेल या रस्त्याकरिता पाटबंधारे विभागाने जागा उपलब्ध करून दिली. यामुळे या भागातील औद्योगिक वसाहतीमधील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
- काळेपडळ ते रवी पार्क (हांडेवाडी ) या मार्गासाठी जागा ताब्यात आली असून, येथे सहा मीटर रुंदीचा रस्ता बांधल्यानंतर ससाणेनगर रेल्वे पुलाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार होईल.
- विमाननगर ते विमानतळ (एअरपोर्ट ) या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता तयार केला जाणार आहे तसेच आणखी एका रस्त्यासाठी जागा ताब्यात आली आहे.
- सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून इंडियन ह्युम पाइप ते गंगा चौक येथे रस्ता तयार केला जाईल. पुढे हाच रस्ता दुधाणे लॉन्स येथे उभारण्यात येणार्या प्रस्तावित पुलाला जोडला जाईल.
- 509 चौक ते लोहगाव हा रस्ता तयार करण्यासाठी जागा ताब्यात आली आहे. यामुळे लोहगावला जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार होईल.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.