Wrong Side Driving Pudhari
पुणे

Sinhgad Road Wrong Side Driving: सिंहगड रस्त्यावर ‘रॉंग साईड’चा धुमाकूळ; धायरी ते नांदेड सिटी मार्ग अपघातप्रवण

अवैध पार्किंग, रस्त्यालगतचे टेम्पो अन् बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे वाहतुकीचा बोजवारा; पोलिसांकडून कडक कारवाईचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: धायरी उड्डाणपूल व प्रयेजा सिटी फाट्याकडून नांदेड सिटी गेटकडे येणाऱ्या सिंहगड रस्त्यावर वाहनचालक सर्रास रॉंग साईडने वाहने चालवत आहेत. त्यामुळे या भागात सतत लहान-मोठे अपघात घडून दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. यावरून आता धायरी उड्डाणपूल ते नांदेड सिटी रस्त्यावर चालकांची वाढती बेशिस्त आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग सध्या अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) बनत चालला असल्याचे समोर येत आहे.

सिंहगड रस्त्याच्या या मार्गावर बेकायदेशीरपणे पार्क केलेली अवजड वाहने आणि चारचाकी गाड्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. यातच भर म्हणून रस्त्याच्या कडेला टेम्पो उभे करून भाजी व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. येथे खरेदीसाठी थांबणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, पाठीमागून येणाऱ्या दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. यात खास करून दुचाकीस्वारच मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियमांची अशी तशी करत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वारांकडून रॉंग साईड प्रवेश होत असल्याचे पाहायला मिळते.

सातत्यपूर्ण पोलिस कारवाई आणि मार्गदर्शक फलक लावा

वाहतूक नियमांची सर्रासपणे ऐशीतैशी करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कोणताही मोठा किंवा जीवघेणा अपघात घडण्यापूर्वी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी या भागात तत्काळ बंदोबस्त आणि मार्गदर्शक फलक (नो एंट्री, प्रवेश निषिद्ध) लावून येथील बेशिस्त वाहतूक नियंत्रणात आणावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी करत आहेत.

...तर तुरुंगवास आणि पाच हजारांपर्यंत होणार दंड

नियमांनुसार विरुद्ध दिशेने किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत दंड किंवा ६ महिने ते १ वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. तसेच, वारंवार असे उल्लंघन केल्यास आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते.

संबंधित रस्त्यावर सुरू असलेली अनधिकृत नो एंट्री (रॉंग साईड प्रवेश) आणि अनधिकृत पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल.
डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT