सिंहगड रस्ता उड्डाणपुलाचे लोकार्पण; उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला Pudhari
पुणे

Sinhgad Road Flyover Inauguration: सिंहगड रस्ता उड्डाणपुलाचे लोकार्पण; उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

तीन टप्प्यांत 118.37 कोटी रुपये निधीतून उभा राहिला उड्डाणपूल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहराच्या वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्प्यांतला सुमारे अडीच किलोमीटरचा पूल हा अत्यंत महत्त्वाचा असून, या पुलामुळे पुणेकरांची ट्राफिकमधून तर सुटका होणारच आहे; शिवाय प्रदूषण कमी होईल. तीन टप्प्यांत 118.37 कोटी रुपये निधीतून हा उड्डाणपूल उभा राहिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी ही भेट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पणानंतर दिली.

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फनटाइम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (Latest Pune News)

या वेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे या वेळी उपस्थित होते.

तीस मिनिटांचा कालावधी आता सहा मिनिटांवर

पूर्वी राजाराम पूल ते फनटाइम थिएटर या 2.6 किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी सुमारे 30 मिनिटांचा कालावधी लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा वेळ आता केवळ 5 ते 6 मिनिटांवर आला आहे.

पुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन करून दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूकक्षमता, प्रशस्त पदपथ आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, दुभाजकाचे सुशोभीकरण सीएसआरअंतर्गत दोन एजन्सींमार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील पाच वर्षे त्यांच्याच माध्यमातून होणार आहे.

मराठा आंदोलकांना घेतले ताब्यात

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. हे समजताच परिसरातील काही मराठा आंदोलक एकत्र जमून निवेदन देण्याच्या तयारीत होते, त्यांना पोलिसांनी पासलकर चौक उड्डाणपूल येथून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT