खडकवासला: सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल उभारूनही वाहतूक कोंडीचे ग्रहण कायम आहे. रविवारी सुटीच्या दिवशी सकाळपासूनच राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, वडगाव बुद्रुकपासून धायरी, नांदेड, किरकटवाडी फाटा आदी ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यटकांसह परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याच्या हेतूने धायरी फाटा येथील कै. रमेश वांजळे उड्डाणपूल व विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर असे उड्डाणपूल उभारण्यात आले. मात्र, धायरी फाटा, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, माणिकबाग परिसरात होणारी मोठी कोंडी लक्षात घेता इथला कोंडीचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे चित्र आहे. (Latest Pune News)
गोयलगंगा चौक ते विठ्ठलवाडी यादरम्यानच्या पुण्याकडे जाणार्या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शिवाय विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर पुलामुळे वडगाव बुद्रुक येथील वीर बाजी पासलकर चौक (हायवे पुलाखाली) पिकअवर्समध्ये वाहनांच्या मोठ्या रांगा लागताना दिसतात.
प्रशासनाने धायरी फाटा ते पुणेकडे जाणार्या मार्गावर वीर बाजी पासलकर चौकातील एक लेन वाहनांसाठी खुली केली आहे. मात्र, पुणे मार्गावरून सायंकाळच्या वेळेस येताना नोकरदार व आता शाळा सुरू झाल्याने स्कूलबस वाहतूक कोंडीत अडकत आहेत. पर्यायी रस्ता नसल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे.
लायगुडे रुग्णालयातील दुभाजक खुला केल्याने कोंडीत भर
लगडमळा येथील लायगुडे रुग्णालयाकडे जाणार्या चौकात दुभाजक बंद करण्यात आला होता. मात्र, तो पुन्हा खुला केल्याने अवजड वाहने येथून जात आहेत. यामुळे अवजड वाहनांना वळण घेताना कसरत करावी लागत आहे. परिणामी, येथे वाहतूक कोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. येथील दुभाजक पुन्हा बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला विधानसभाध्यक्ष सागर कोल्हे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
डीपी रस्त्यांची कामे ठप्प
सिंहगड रोडवरील उपनगर परिसरातील डीपी रस्त्यांची कामे सध्या ठप्प आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने प्रस्तावित केलेल्या रस्त्यांची कामे सुरू करावीत, अशी मागणी नांदेड सिटीचे संचालक अॅड. नरसिंह लगड व नागरिकांनी केली आहे.