पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर, विठ्ठलनगर या सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार बुधवारी घडला. या घटनेनंतर सोसायटीचे स्थलांतर करून येथे पुनर्वसन योजना राबवण्यासह पुराचे पाणी शिरू नये यासाठीच्या उपाययोजना दोन वर्षांनंतरही कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे मुठा नदीला आलेल्या पुरामुळे सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी, विठ्ठलनगर, निंबजनगर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थिती कायमस्वरूपी रोखण्यासाठी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंतर्गत वडगाव खुर्द ते राजाराम पूल हा ४.१० किमी लांबीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.
या प्रकल्पांतर्गत नदीकिनारी सीमाभिंत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार असून, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत या निधीची मागणी करण्यात आली आहे. तर, दुसरा पर्याय म्हणून या सर्व सोसायट्यांचा एकत्रितरीत्या क्लस्टर योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना महापालिकेने आखली आहे.
त्यासंबंधीचा प्रस्तावही महापालिकेने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत या दोन्ही प्रस्तावांवर राज्य शासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे एकतानगरी, विठ्ठलनगर, निंबजनगर या सोसायट्यांमधील रहिवाशांना पाऊस सुरू झाला की जीव मुठीत धरूनच राहावे लागत आहे. बुधवारी येथील रहिवाशांनी पुन्हा हा अनुभव घेतला.
एकतानगर, विठ्ठलनगर या सोसायट्यांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरू नये, यासाठी नदीकाठ सुधारणा प्रकल्पातंर्गत सीमाभिंत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य सरकाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्याचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.- अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे.