Sinhagad Development Garden Pudhari
पुणे

Pune Sinhagad Development Garden: सिंहगड विकास उद्यानात स्वच्छतागृह, पाण्याचा ठणठणाट; नागरिकांची गैरसोय

वडगाव बुद्रुकमधील उद्यानातील मूलभूत सुविधा गायब; महामार्ग ओलांडून स्वच्छतागृहात जाण्याची वेळ, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद पानसरे

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील महामार्गावरील उड्डाणपुलाखाली असलेले सिंहगड विकास उद्यान विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. उद्यानात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि इतर नागरिकांची गैरसोय होत आहे. या समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या वतीने सुमारे नऊ ते दहा वर्षांपूर्वी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्यासाठी नळकोंडाळे, महिला व खेळाडूंसाठी कपडे बदलण्याची खोली तसेच साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, उद्यानातून दोन्ही सेवा रस्त्यांना जोडणारा रस्ता तयार करताना या सुविधा हटविण्यात आल्या. जोडरस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही या सुविधांची पुनर्बांधणी करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, उद्यानात येणाऱ्यांना मूलभूत सुविधांअभावी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या उद्यानात लहान मुलांसाठी झोके व पाळणे, नागरिकांच्या व्यायामासाठी साहित्य, तसेच बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलसारख्या खेळांसाठी सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक आणि बसण्यासाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी लहान मुले, महिला, युवक-युवती, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी असते.

स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत आहे. उद्यानात येणाऱ्यांना महामार्गावरील वर्दळीचा रस्ता ओलांडून समोरील हॉटेलमध्ये किंवा वाहतूक शाखेच्या स्वच्छतागृहात जावे लागत असल्याने अपघाताचा धोका आहे. त्यामुळे उद्यानात तातडीने स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

या उद्यानात येणाऱ्या महिला, लहान मुले आणि नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे उद्यानात तातडीने स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यासाठी नळकोंडाळे उभारावे; अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
राजेंद्र कांबळे, रहिवासी, वडगाव बुद्रुक
उद्यानातील समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. तसेच, शौचालयासह इतर आवश्यक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
हरिदास चरवड, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT