मंचर: सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने बटाटा लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सातगाव पठार भागातील वेळ नदी दुथडी भरून वाहत आहे. विहिरी, बारव, विंधनविहिरी भरल्या आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे वेळ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
अनेक शेतकर्यांनी बटाटा बियाणे शेडमध्ये पसरवून मुरायला टाकले आहे. संततधार पावसामुळे बटाटा लागवड लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. पावसाने जर उघडीप दिली आणि चार-पाच दिवसांमध्ये जमिनीत वापसा तयार झाल्यावर बटाटा लागवडीला सुरुवात होणार आहे. पाऊस असाच चालू राहिला, तर जमिनीत वापसा तयार होण्यास वेळ लागणार आहे. (Latest Pune News)
साधारणतः जूनमध्ये बटाट्याची लागवड पूर्ण होते. मात्र, यंदा वेळेआधी झालेल्या पावसामुळे शेतातील मशागतच पूर्ण झाली नाही. शेतात पाणी साचल्याने बटाटा लागवड लांबणीवर पडली आहे. बटाटा वेळेवर लावणे अत्यंत आवश्यक असते. उशिरा लागवड केल्यास पुढील पिकांसाठीसुद्धा उशीर होतो, असे पेठे येथील विशाल तोडकर यांनी सांगितले.
अतिपाऊस, बटाटा बियाण्यांचे तेजीत असलेले बाजारभाव, खते, औषधे यांच्या वाढलेल्या किमती, मजुरांची टंचाई यामुळे चालू वर्षी बटाटा लागवडीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी बटाटा लागवडीमध्ये जवळपास 25 टक्के घट होण्याची शक्यता आहे, असे बटाटा व्यावसायिक रामशेठ तोडकर यांनी सांगितले.
आम्ही बटाटा बीज व खते आधीच विकत घेतली आहेत. मात्र, शेतात पाणी आहे. पाऊस उघडण्याची आणि जमिनीत वापसा होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. बटाटा बियाणे मुरून लागवडीयोग्य झालेली आहेत. पण, पाऊस उघडला नाही, तर थोड्याफार प्रमाणात बटाटा बियाण्यांचे नुकसान होऊ शकते.- शिवाजी पवळे, शेतकरी, वरखेडेवस्ती
शेतात पूर्ण वापसा झाल्यावरच बटाटा लागवड, सोयाबीन किंवा अन्य पिकांची लागवड करावी; अन्यथा नुकसान होऊ शकते. हवामान सुधारताच लागवड करावी.- सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव