

Pune Dam Water Level
खडकवासला: पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रातील डोंगरी पट्ट्यात शुक्रवारी दुपारपासून संततधार सुरू आहे. मोसे खोर्यातील जोरदार पावसामुळे सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 9.25 टीएमसी म्हणजे 31 .73 टक्के पाणीसाठा झाला होता. सिंहगड-खडकवासला परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करून दुपारी बारा वाजता 7 हजार 898 क्युसेक करण्यात आला.
गुरुवारी (दि. 19) सकाळी सहा ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पानशेत येथे 165 मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारी पावसाचे प्रमाण कमी झाले. दिवसभरात पानशेत येथे 25, वरसगाव येथे 26, टेमघर येथे 32 व खडकवासला येथे फक्त 2 मिलिमीटर पाऊस पडला.(Latest Pune News)
गुरुवारी दुपारी एकपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात तब्बल 0. 80 टीएमसी पाणी सोडण्यात आले. धरणसाखळीत गेल्या 24 तासांत 0.57 टीएमसी पाण्याची भर पडली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 8 .68 टीएमसी साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास सहा टीएमसी अधिक पाणी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 20 जून रोजी धरण साखळीत 3.57 टीएमसी पाणी होते.
पानशेत धरण विभागाचे शाखा अभियंता अनुराग मारके म्हणाले, धरणसाखळीत वाढ झालेल्या पाण्यापेक्षा जादा पाणी खडकवासलातून सोडण्यात आले. मुठा नदीची पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खडकवासलातील पाण्याची पातळी 70 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात येत आहे. खडकवासला धरण माथ्याच्या परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणक्षेत्रात दिवसभर रिमझिम सुरू आहे.