भवानीनगर : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाची एकतर्फी वाटणारी निवडणूक बघता बघता चुरशीची झाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांचे आता निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
श्री छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय पॅनल उभा करून सुरुवातीच्या काळात कारखान्याच्या परिसरातील विरोधाची हवा काढून घेतली होती. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय 'श्री जय भवानी माता' पॅनंल जाहीर झाला. त्यानंतर काही तासातच श्री छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, तानाजीराव थोरात व मुरलीधर निंबाळकर या विरोधकांनी एकत्र येत 'श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनेल' जाहीर केला.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होत असताना 'श्री जय भवानी माता पॅनल'ने २१ जागांवर उमेदवार उभे केले, परंतु श्री छत्रपती बचाव पॅनेलला २१ जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यांनी १५ जागांवरच उमेदवार उभे करून पॅनेल उभा केला व निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात केली. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी दोन्ही पॅनेलकडून झाडल्या जात आहेत. दोन्ही पॅनेलकडून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावागावांमध्ये सभा घेऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्ही पॅनेलमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना अनेक सभासदांकडून कारखान्याच्या मागील दहा वर्षांमध्ये आलेल्या अडचणींचा पाढा वाचला जात आहे. दोन्ही पॅनलची नेतेमंडळी यामध्ये सुधारणा करण्याचे सभासदांना आश्वासन देत आहेत.
दोन्ही पॅनेलकडून सुरू असलेल्या जोरदार प्रचारामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढत चालली आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे १८ मे रोजी मतदान होणार असून १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कारखान्याचे सुमारे २२ हजार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.