परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे भटकी कुत्री लचके तोडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थांत संताप वाढला आहे. याबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता कुत्र्यांकडून मृतदेहांची होणारी विटंबना थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.(Latest Pune News)
वीर येथील स्मशानभूमी परिसरात एका बाजूला ओढा, तर दुसऱ्या बाजूला बिअर बार हॉटेल आणि कचरा डेपो आहे. त्यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हॉटेलमधील टाकाऊ अन्नपदार्थ खाण्यासाठी कुर्त्यांची येथे नियमित वर्दळ असते. याच कुत्र्यांनी स्मशानभूमीत येऊन अर्धवट जळालेल्या प्रेतांचे अवशेष ओढून नेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
येथे अग्नी दिल्यानंतर ग्रामस्थ निघून जातात. त्यानंतर काही तासांनी भटकी कुत्री काहीवेळा अग्नीतून बाजुला गेलेले किंवा अर्धवट जळालेले मृतदेहाचे अवयव बाहेर काढतात. यासाठी ही कुत्री शेजारील ओढ्याच्या पाण्यात आपले शरीर बुडवतात, असे येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, काही महिन्यांपासून अत्यविधीनंतर मृतदेहांच्या अस्थीही कमी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हीच कुत्री पूर्ण जळालेल्या मृतदेहाच्या अस्थीही नेत असल्याचे सांगण्यात येते. या प्रकारामुळे येथील नागरिकांत रोष वाढला आहे.
दरम्यान, अनेकदा येथील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. त्याकडे मात्र कायम दुर्लक्ष झाले आहे. सध्या वीर परिसरात सुमारे 100 ते 120 भटकी कुत्री असल्याचे नागरिक सांगतात. या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केले असून, सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्यांनाही त्रास होत आहे. आता ही कुत्री मृतदेहाचे लचके तोडत आहेत. पुढे एखाद्या जिवंत माणसावर हल्ला केल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मृतदेहांची विटंबना रोखण्यासाठी नागरिकांनी स्मशानभूमी परिसराला तातडीने तारेचे कंपाउंड आणि गेटची व्यवस्था करावी, मृतदेह संपूर्ण जळत नाही तोपर्यंत ग्रामपंच्यातीने एक कर्मचारी तेथे उपस्थित ठेवावा, अशी मागणी केली आहे.
वीर येथील स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे भटकी कुत्री लचके तोडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.