पुणे: शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक असा मोठा वारसा लाभलेला आहे. पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आणि जुनी मंदिरे आहेत. त्यात बदलत्या काळात भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिकता जपणार्या नव्या मंदिरांचीही भर पडली आहे. त्यातील एक म्हणजे सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर.
पुण्यातील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक. विशेष म्हणजे, या मंदिरात तीन देवींच्या मूर्ती आहेत. श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता आणि श्री महाकाली माता. या तिन्ही देवींच्या मूर्ती मंदिरात असून, भाविकांसाठी त्या श्रद्धास्थानी आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावर्षी त्रिशक्ती राजमहाल साकारण्यात आला असून, प्रत्येक स्त्रीमध्ये असणार्या दिव्यतेच्या संकल्पनेवर ही सजावट आधारित आहे. भाविक मंदिरात दर्शनासह यंदाची सजावट पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.(Latest Pune News)
शहरातील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक असलेले मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर. मंदिरातील महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या देवींच्या स्थापित मूर्ती सहा फूट उंच असून, त्यातील महालक्ष्मी आणि महासरस्वतीची मूर्ती संगमरवरात कोरलेल्या आहेत, तर महाकाली मातेची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. अलीकडच्या काळात त्या सोन्याने सुशोभित केलेल्या आहेत.
15 फेब्रुवारी 1984 रोजी तीर्थस्वरूप स्वामी घनश्यामजी आचार्य यांच्या हस्ते या तिन्ही देवींच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि हे मंदिर सार्वजनिक पूजेसाठी खुले करण्यात आले. या तीन मुख्य देवतांव्यतिरिक्त या मंदिरात बारा प्रमुख संतांच्याही मूर्ती भिंतीवर कोरलेल्या आहेत.
सर्वांगसुदंर द्रविड वास्तुशैलीत हे मंदिर बांधले गेलेले आहे. संपूर्णपणे पांढर्या संगमरवराचा वापर करून बनविले गेले आहे. यात कुठेही स्टीलचा वापर न करता इंटरलॉकिंग पद्धतीने बनविलेले आहे, हे वेगळेपण म्हणता येईल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरातील नवरात्रोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. यंदाच्या सजावटीची संकल्पना त्रिशक्ती राजमहाल प्रत्येक स्त्रीमधील त्रिशक्तीला अर्पण अशी आहे. मंदिराचे सर्वांत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे येथे त्रिदेवींचा वास आहे. श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता आणि श्री महाकाली माता.
श्री महालक्ष्मी या आपल्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात. श्री महासरस्वती या ज्ञान आणि प्रकाशाची देवी आहेत, तर श्री महाकाली माता या अंधार आणि जीवनातील वाईट शक्तींवर विजय मिळविण्यासाठी आवश्यक बळ देतात.
नवरात्रोत्सव 2025 च्या निमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे उभारलेला भव्य राजमहाल या त्रिदेवींमध्ये नांदणार्या त्रिशक्ती या दैवी शक्तींच्या प्रेरणेने साकारण्यात आला आहे. त्रिशक्ती राजमहाल हा नवरात्रोत्सवात भक्तांचे देवींच्या राजदरबारात स्वागत करण्यासाठी खास उभारलेला आहे. या सजावटीचे रंग, नक्षिकाम आणि विविध घटक हे प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली दिव्यता संकल्पनेवर आधारित आहे.
या सजावटीच्या संकल्पनेबाबत बोलताना मंदिराच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणला की, हे भव्य राजमहाल त्रिमूर्तींना समर्पित आहे. या तीन देवी प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या ज्ञान, समृद्धी आणि शक्ती, या तीन अत्यंत महत्त्वाच्या गुणांचे प्रतीक आहेत. या देवींच्या आशीर्वादाने आणि गुणांनी प्रत्येक स्त्रीच्या खर्या जागृतीचे आणि आनंदाचे दरवाजे उघडतात.
हा विश्वासच यावर्षी मंदिरातील सजावटीसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. गेल्या काही दशकांत श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे हे श्रद्धेचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्त्रीसक्षमीकरणाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. यावर्षी त्रिशक्ती राजमहाल हा त्रिदेवींना वंदन करण्यासाठी उभारला गेला आहे, जो सांस्कृतिक व आध्यात्मिकदृष्ट्या भव्य नजारा साकारतो. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व भक्त गर्दी करीत आहेत.
मंदिरातील देवींविषयी जाणून घेऊयात...
श्री महालक्ष्मी माता
माता लक्ष्मी हिंदू धर्मातील संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवता आहे. ती भगवान विष्णू यांची पत्नी आहे आणि त्यांची सक्रिय शक्ती आहे. तिच्या चार हातांमध्ये मानवी जीवनाचे चार ध्येये आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ती भगवान विष्णू यांना देखील सामर्थ्य देते. जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर श्री राम आणि श्री कृष्ण या अवतारांमध्ये अवतरले, तेव्हा लक्ष्मीमाता सीता आणि रुक्मिणी म्हणून अवतरल्या. आधुनिक काळात लक्ष्मीमातेला संपत्तीची देवी म्हणून संबोधले जाते. दीपावली आणि शरद पौर्णिमा (कोजागरी पौर्णिमा) हे सण तिच्या सन्मानार्थ साजरे केले जातात.
श्री सरस्वती माता
माता सरस्वती ही हिंदू धर्मातील ज्ञान, संगीत, कला, शहाणपण आणि शिक्षणाची देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या त्रयीचा एक भाग आहे. या तिन्ही देवी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना अनुक्रमे विश्वाची निर्मिती, पालनपोषण आणि पुनर्जन्म करण्यास मदत करतात. वैदिक काळापासून आधुनिक हिंदू परंपरेत देवी म्हणून सरस्वतीमातेचे महत्त्व आहे. वसंत पंचमीचा हा सण तिच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी लहान मुलांना अक्षरे शिकविण्यास प्रारंभ करतात.
श्री महाकाली माता
माता काली यांना 'कालिका' असेही म्हणतात. ती शक्तीशी संबंधित हिंदू देवी आहे. ती दुर्गेच्या उग्र रूपांपैकी एक आहे. 'काल' या शब्दाचा अर्थ 'काळा' आणि 'वेळेची शक्ती' असा आहे. म्हणूनच तिला काळा, बदल, शक्ती, निर्मिती, संरक्षण आणि विनाशाची देवी म्हटले जाते. तिचे रूप हे वाईट शक्तीच्या विनाशकाचे आहे. भारतभर तिची उपासना होते.