भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षकि निवडणुकीसाठी अनेक राजकीय घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचे सूर जुळले असून, त्यांनी सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनेल जाहीर केला आहे.
सर्वपक्षीय पॅनेल जाहीर करण्यासाठी मागील तीन-चार दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरू होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये पॅनेलच्या जागावाटपावरून राजकीय नाट्य सुरू होते. गुरुवारी संध्याकाळी पवार, भरणे आणि जाचक यांची बैठक झाल्यानंतर पॅनेलच्या जागा निश्चित करण्यात आल्या व शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री जय भवानीमाता पॅनेल जाहीर करण्यात आला आहे. (Latest Pune News)
श्री जय भवानीमाता पॅनेलमधून लासुर्णे या गट क्रमांक 1 मधून पृथ्वीराज साहेबराव जाचक, जामदार शरद शिवाजी, सणसर गट क्रमांक 2 मधून निंबाळकर रामचंद्र विनायक व निंबाळकर शिवाजी रामराव उद्धट, गट क्रमांक 3 मधून घोलप पृथ्वीराज श्रीनिवास व कदम गणपत सोपान, अंथुर्णे या गट क्रमांक 4 मधून शिंगाडे विठ्ठल पांडुरंग, दराडे प्रशांत दासा, नरुटे अजित हरिश्चंद्र, सोनगाव या गट क्रमांक 5 मधून अनिल सीताराम काटे, बाळासाहेब बापूराव कोळेकर व संतोष शिवाजी मासाळ.
तर गुणवडी या गट क्रमांक 6 मधून कैलास रामचंद्र गावडे, सतीश बापूराव देवकाते व नीलेश दत्तात्रय टिळेकर यांना, ’ब’ वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था यामधून पाटील अशोक संभाजीराव, अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गामधून मंथन बबनराव कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी प्रवर्गातून सौ. राजपुरे माधुरी सागर व सौ. सपकळ सुचिता सचिन, तर इतर मागास प्रवर्गातून शिंदे तानाजी ज्ञानदेव व भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून डॉ. पाटील योगेश बाबासाहेब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.