Shravan Sari 2026 Pudhari
पुणे

Shravan Sari 2026: पुण्यात ‘श्रावण सरी’चा जल्लोष; मंगळागौर, कलाकारांशी गप्पा अन् ‘श्रावण क्वीन’ची रंगत

कस्तुरी क्लबच्या सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; नेहा संकपाळ ठरल्या ‘पुढारी कस्तुरी श्रावण क्वीन २०२६’

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सादर केलेला मंगळागौर कार्यक्रम, सन मराठी वाहिनीवरील कलाकारांशी संवाद साधण्याची मिळालेली संधी, मनोरंजक खेळ अन्‌ सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला श्रावणी सरी हा कार्यक्रम महिलांसाठी पर्वणी ठरला. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि सन मराठीच्या वतीने श्रावणानिमित्त खास महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्‍यान, कलाकारांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या कार्यक्रमांची माहिती दिली. ‘तुम्हाला आम्हाला भेटायचे असेल, तर आम्ही तुम्हाला दररोज ‘सन मराठी’वर भेटू,’ असे त्यांनी सांगितले. सखू आणि दिघु म्हणाले की, आम्हाला संध्याकाळी ७.३० वाजता, तर सौभाग्यवती वृंदा मोहन म्हणाले, आम्हाला रात्री ९.४५ वाजता 'सन मराठी'वर पाहता येईल.

‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून पुणे - सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात रंगलेल्या ‘श्रावण सरी’ या कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक मराठमोळा पेहराव, दागिने आणि नटून-थटून आलेल्या कस्तुरींनी प्रत्येक उपक्रमात आनंदाने, उत्साहाने सहभाग घेतला. महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासह व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘श्रावण सरी’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आणखी रंगत आली ती ‘सन मराठी’ वाहिनीवरील कलाकारांच्या उपस्थितीने. ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’मधील स्वाती भिंगारदिवे (वृंदा) आणि संग्राम समेळ (अभिमन्यू), तसेच ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतील सान्वी जांबेकर (सखू) आणि गणेश जाधव (दिघू) या कलाकारांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. मालिकांमधून आपल्या घराघरांत पोहोचलेल्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कलाकारांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्याची संधीही त्यांना मिळाली. कलाकारांनीही कस्तुरी सदस्यांशी मनमोकळा संवाद साधत कार्यक्रमांचा आनंद घेतला.

त्यांनी प्रत्येक उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. कलाकारांसोबत संवादाची आणि छायाचित्र, सेल्फी क्लिक करण्याची संधीही महिलांना मिळाली. या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या ‘पुढारी कस्तुरी श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेतही महिलांनी चमकदार कामगिरी केली. सौंदर्याबरोबरच आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व, सादरीकरण आणि पेहराव अशा विविध निकषांवर स्पर्धकांची कसोटी घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाने आपली वेगळी शैली आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व सादर करत स्पर्धेत रंगत आणली. नेहा संकपाळ यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ‘पुढारी कस्तुरी श्रावण क्वीन २०२६’चा मान पटकावला. रोहिणी राऊत प्रथम उपविजेत्या, तर अश्विनी निकम द्वितीय उपविजेत्या ठरल्या. विजेत्या आणि उपविजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

तसेच ‘बेस्ट ग्रुप लीडर’ स्पर्धेत मृणाल पटवर्धन यांनी बाजी मारली. त्यांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक कस्तुरी सदस्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेतील स्पर्धकांनी केलेल्या आकर्षक पेहरावाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून महिलांनी उपस्थितांनी दाद मिळवली. या सोहळ्यासाठी रितू लोखंडे यांचे लोखंडे’स स्टायलिंग स्टुडिओ, लीना करपे यांचे ली डिझाईन स्टुडिओ, डॉ. रवींद्र बर्वे यांचे एस्ट्रोहब, निखिल पाटील यांचे निखिल १ ग्रॅम गोल्ड फार्मिंग ज्वेलरी आणि मंजूषा देशमुख यांचे व्हाईट पर्ल यांनी गिफ्ट पार्टनर म्हणून सहकार्य केले. कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक महिलेला निखिल पाटील यांचे निखिल १ ग्रॅम गोल्ड फार्मिंग ज्वेलरीकडून मिनी मंगळसूत्रचे कूपन भेट देण्यात आले.

‘पुढारी कस्‍तुरी श्रावण क्‍वीन २०२६’ स्पर्धेत सर्व स्पर्धक खूप हटके आणि परफेक्ट पेहराव करून आल्या होत्या. कार्यक्रमाचे नियोजनही उत्तम होते. सुरुवातीपासूनच कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते.
निखिल पाटील, निखिल १ ग्रॅम गोल्ड फार्मिंग ज्वेलरी
सर्व कस्तुरींचा उत्साह खूपच छान होता. सर्व महिला खूप सुंदर दिसत होत्या. कार्यक्रमात त्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून आनंद झाला.
मंजूषा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हाईट पर्ल ब्यूटी इन्स्टिट्यूट
सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व कस्तुरी खूप एन्जॉय करत होत्या. त्यांच्या उत्साहाकडे पाहून नवीन उत्साह निर्माण झाला. कस्तुरीसोबतचे सर्व कार्यक्रम आमच्यासाठी खूप मोलाचे असतात
लीना करपे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ली डिझाईन स्टुडिओ
कस्तुरी क्लबच्या वतीने एका स्तूत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांना एकत्र आणून त्यांच्यातील उत्साह आणि कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमाचा भाग होता आले, याचा आनंद आहे.
डॉ. रवींद्र बर्वे, एस्ट्रोहब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT