Shravan month Guruji on demand for puja
पुणे: श्रावण महिना म्हणजे सणवार अन् व्रतवैकल्यांचा... सत्यनारायण पूजा असो वा वास्तुशांतीची पूजा... गृहप्रवेश असो वा श्रावणी सोमवारची पूजा... असे धार्मिक उपक्रम तर होणारच... दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील धार्मिक उपक्रमांसाठी गुरुजींकडे विचारणा सुरू झाली असून, संपूर्ण श्रावणात एका गुरुजींकडे 40 ते 50 पूजेसाठी बुकिंग झाले आहे.
सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, गृहप्रवेश आणि श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी पुण्यातील गुरुजी मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यांचाही प्रवास करीत असून, काही गुरुजींकडे परदेशातूनही ऑनलाइन पूजेसाठी विचारणा होत आहे. विशेष म्हणजे, श्रावण महिन्यासह गणेशोत्सवातील धार्मिक उपक्रमांसाठी आत्तापासूनच अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. (Latest Pune News)
श्रावणात पाऊस बरसण्यासह सणासुदीच्या रेलचेलीतून आसमंत चैतन्यमयी आणि प्रफुल्लित होते. हा महिना धार्मिक उपक्रमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. नवीन गृहप्रवेशासह अनेक जण नवीन कार्यालाही सुरुवात करतात. सगळीकडे धार्मिक वातावरण असते आणि यानिमित्ताने अनेक धार्मिक उपक्रमही आयोजित केले जातात.
श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजनासह श्रावणात रुद्राभिषेक, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, गृहप्रवेशाची पूजा असे धार्मिक उपक्रम होतात. या धार्मिक उपक्रमांसाठी गुरुजींना बोलावले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुजींकडे श्रावणातील उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा झाली आहे. एका उपक्रमासाठी गुरुजी साधारणपणे 2 ते अडीच हजार रुपयांची दक्षिणा घेत आहेत.
याविषयी ‘गुरुजी ऑन डिमांड’ संस्थेचे अजित चावरे म्हणाले की, श्रावण महिन्यातील सणांना खूपच महत्त्व आहे. या महिन्यात अनेक सण येत असतात तसेच अनेकंजण विविध धार्मिक उपक्रमही करून घेतात. हे उपक्रम गुरुजींच्या माध्यमातूनच होणे आवश्यक असते. त्यामुळेच यंदाही गुरुजींकडे धार्मिक उपक्रमांसाठीचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. विविध जिल्ह्यांमधूनही गुरुजींना श्रावणातील धार्मिक उपक्रमांसाठी विचारणा होत आहे.
श्रावण महिना सणासुदीचा असतोच; त्याशिवाय धार्मिक उपक्रमही या महिन्यात केले जातात. श्रावणात मंगळागौर, सत्यनारायण पूजेसाठी विविध जिल्ह्यांमधून विचारणा होते. यंदाही धार्मिक उपक्रमांसाठी चांगला प्रतिसाद आहे. जवळपास 70 धार्मिक उपक्रमांसाठीचे बुकिंग झाले आहे. सत्यनारायण पूजा आणि वास्तुशांती पूजेसाठी सर्वाधिक बुकिंग आहे. कोथरूड, कर्वेनगर, वारजे-माळवाडी, धायरी, बाणेर आदी ठिकाणी पूजेसाठी जात आहे. श्रावणाबरोबरच गणेशोत्सवासाठीच्या उपक्रमांसाठीही आत्तापासूनच विचारणा सुरू झाली आहे.- उमेश जोशी, गुरुजी