पुणे

धक्कादायक! ‘ससून’मधून शिक्के चोरून फिटनेस प्रमाणपत्र

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातून शिक्के चोरून बनावट फिटनेस सर्टिफिकेट बनविणार्‍या एकाला ससून रुग्णालयात प्रशासनाने पकडून बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले. प्रकाश पांडुरंग मोंडकर (34, कणकवली, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार सत्पाल पवार (रा. ओगलेवाडी, कराड, सातारा) याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. शैलेश शिवशंकर दामशेट्टी (26, रा. गुंजन सोसायटी, रास्ता पेठ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ दामशेट्टी हे ससून रुग्णालयात मागील दोन महिन्यांपासून वॉर्ड नंबर 74 या ठिकाणी आरएमओ म्हणून नोकरी करीत आहेत.

वैद्यकीय अधीक्षक किरणकुमार जाधव हे त्यांचे प्रमुख म्हणून काम करतात. दि. 14 डिसेंबर रोजी ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर 74 या ठिकाणी काम करत असताना डॉ. जाधव हे रुग्णांच्या केसपेपरवर सही करत होते. त्यावर शिपाई अरुण मांडवेकर हे डॉ. जाधव यांच्या सही खाली त्यांचा शिक्का मारण्याचे काम करत होते. त्याच दिवशी दुपारी डॉ. जाधव यांनी पेशन्टच्या केसपेरवर सही केली. मांडवेकर यांनी शिक्का शोधला परंतु, त्यांना तो सापडला नाही. याबाबत त्यांनी डॉ. जाधव यांना सांगितले. त्या वेळी मांडवेकर यांनी शेवटी आलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला.

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटी आलेल्या व्यक्तीने ते शिक्के खिशात घालून नेल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्हीत कैद झालेली व्यक्ती बुधवारी डॉ. जाधव यांची सही घेण्यासाठी आल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव मोंडकर असल्याचे सांगितले. तसेच त्याची बॅग तपासली असता त्याच्या बँगेत त्यांना दोन शिक्के सापडले. दरम्यान, त्याला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याजवळील बँगेची तपासणी केली असता त्यामध्ये ससून हॉस्पिटलकडील कंट्युनिशन सिट पेपरवर प्रकाश मोंडकर नावाचे फिटनेस तपासल्याची नोट व त्यावर डॉ. प्राजक्ता बहिलुम यांच्या नावाचा शिक्का मारून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मोंडकरसह त्याच्या साथीदारावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT